Breaking News

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील सर्व खावटी कर्जधारकांना कर्जमाफीचा फायदा मिळणार

मुंबई, दि. 05, ऑक्टोबर - महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी होत असताना कोकणातील अल्प भूधारक शेतकरी मात्र या कर्ज माफी पासून नेहमीप्रमाणे वंचित राहण्याची  शक्यता निर्माण झाली होती. कारण कोकणातील अल्पभूधारक शेतक-यांचे अत्यल्प रकमेचे कर्ज हे खावटी कर्ज म्हणून दाखवले जाते. कर्ज माफीच्या शासन  निर्णयामध्ये ’खावटी कर्ज’ या शब्दाचा कर्जाचा समावेश नसल्यामुळे अशा शेतक-यांचे अर्ज स्विकारले तरी त्या अर्जांवर लेखापरीक्षकांनी आक्षेप घेतले होते. त्यामुळे  अशा शेतक-यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही, असे चित्र उभे राहिले होते. महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी व भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे  सदस्य अतुल काळसेकर यांनी या संदर्भात कर्जमाफी विषयक मंत्री गटाचे प्रमुख महसूल मंत्री चंद्रकात पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि शिक्षणमंत्री विनोद  तावडे यांची भेट घेऊन या प्रश्‍नाची वस्तुस्थिती मांडली व कोकणातील पाचही जिल्ह्यातील खावटी कर्जदारांना कर्जमाफीच्या कक्षेत आणावे, अशी आग्रहाची मागणी  केली.
तिन्ही मंत्र्यांनी या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन या शेतक-यांना कर्जमाफीचा पूर्ण फायदा द्यायला सरकार बांधिल आहे व लवकरात लवकर या संदर्भात  सुधारित शासन निर्णय जारी केला जाईल, असे निःसंदिग्ध आश्‍वासन दिले आहे.