Breaking News

जे काही यश मिळविले आहे, ते केवळ हृषिदांमुळेच - जया बच्चन

पुणे, दि. 02, ऑक्टोबर - हृषीकेश मुखर्जी हे मला माझ्या वडिलांसारखेच होते. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये त्यांनी मला मार्गदर्शन केले. आज मी तुमच्यापुढे उभी  आहे, जे काही यश मिळविले आहे, ती केवळ हृषिदांमुळेच ! अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी रविवारी व्यक्त केली. 
फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टीट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या वतीने हृषीकेश मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त स्मरणांजली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते या प्रसंगी बच्चन बोलत होत्या. एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला, विष्णू माथूर, जय अर्जुन सिंग, प्रा. अमित त्यागी आदी यावेळी उपस्थित  होते.
गुड्डी या चित्रपटाच्या शुटींगच्या आठवणींना उजाळा देताना बच्चन म्हणाल्या, एकदा मी जास्तीचा मेकअप करून हृषीदांपुढे उभी राहिले होते. त्यांनी तो काढून मला  साध्या वेशात यायला सांगितलं. मी मेकअप काढून आल्यावर ते म्हणाले होते, ज्या अभिनेत्यांकडे खरी क्षमता नसते असे लोक इतर मार्गांचा अवलंब करून आपण  अभिनय करत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही. तुझी भूमिका शालेय विद्यार्थीनीची आहे ना, मग तू तशीच दिसायला हवे. अशा पद्धतीने मला  करिअरचा मंत्र मिळाल्याचे त्यांनी नमुद केले. दरम्यान, आपल्याला माहित नसणारे हृषीदा’ या विषयावर उपस्थितांनीही मते व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा  दिला आणि ह्रषीकेष मुखर्जींचा सिनेसृष्टीतला प्रवास उलगडला.