Breaking News

कासकडे जाणा-या मुख्य मार्गावरील यवतेश्‍वर घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णत: बंद

सातारा, दि. 02, ऑक्टोबर - साता-याहून कासकडे जाणा-या मुख्य मार्गावरील यवतेश्‍वर घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णत: बदं करण्यात आली आहे.  यामुळे कास पठाराकडे जाणारे पर्यटक अडकले आहेत. घाट खचल्याने घटनास्थळी प्रशासनाचे अधिका-यांनी भेट दिली असून पर्यायी मार्गावरून (महाबळेश्‍वर मार्गे  )वाहतूक वळविले असल्याचे सांगण्यात आले. 
सातार्‍यातील कास पठाराकडे जाणारा रस्ता सोमवारी खचला. त्यामुळे पठाराकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. कास पठारावरील फुलांचा हंगाम बहरला आहे. या  काळात देशातील अनेक भागातून पर्यटक मोठ्या संख्येने कास पठारावर येतात. सध्या पर्यटकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दीही केली आहे. आज सकाळी कास पठाराकडे  जाणारा यवतेश्‍वरच्या घाटातील रस्ता अचानकपणे खचला. परिणामी कास पठाराकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले  आहे.
कास पठारवरील विविध फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटक कास पठाराच्या दिशेने येत होते. मात्र, यवतेश्‍वर घाटाच्या पायथ्याशी आल्यानंतर पर्यटकांना रस्ता  खचल्याचे कळले. येथील रस्त्याचा भाग पूर्णपणे दरीत कोसळला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी  घाटाच्या पायथ्याशीच वाहतूक थांबवली आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून युद्धपातळीवर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, त्यासाठी आणखी बराच  वेळ लागण्याची शक्यता आहे. यवतेश्‍वर घाटातील रस्त्याचे काम लवकरात लवकर करून वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.