Breaking News

छटपुजेच्या प्रदूषणापासून ठाण्यातील तलाव वाचवा; मनविसेची मागणी

ठाणे, दि. 28, ऑक्टोबर - सण - उत्सवांमध्ये ध्वनी आणि वायुप्रदूषणासोबत जलप्रदुषणही होत आहे. जलप्रदूषणाचा थेट परिणाम मानवी आरोग्यासह पशु - पक्षी  आणि जलतरांनाही होत असतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी गणेशोत्सव - नवरात्रोत्सवासाठी जसे कृत्रिम तलाव उभारले त्याचधर्तीवर उत्तर भारतीयांच्या  छटपुजेसाठीदेखील कृत्रीम तलावांची निर्मिती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष संदिप पाचंगे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे  केली आहे.
उपवन तलाव येथे दररोज सकाळी शेकडो लोक चालण्यासाठी, व्यायामासाठी जात असतात. या तलावामध्ये ‘छटपूजा‘ या सणाचे निमित्ताने काही लोकांनी निर्माल्य  तसेच पूजेचे साहित्य या तलावाच्या पाण्यामध्ये टाकलेले आहे. दरवर्षी गणेशउत्सवाच्या काळात गणपती मुर्त्या उपवन येथे विसर्जित करण्यात येऊ नयेत तसेच निर्माल्य  पाण्यात टाकू नये यासाठी मराठी माणसांच्या सणांवर निर्बंध आणले जातात परंतु छटपूजा साजरी होत असताना पाण्याच्या प्रदूषणाची काळजी का घेतली जात नाही.
आपण गणेशउत्सवामध्ये ज्याप्रमाणे कृत्रिम तलाव उभारून पाणी प्रदूषित होण्यापासून वाचविता तसेच इतर समाजाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा कृत्रिम तलाव निर्मिती करावी.  सर्व धर्मियांच्या, समाजाच्या कार्यक्रमात उपवन सारख्या सार्वजनिक ठिकाणी परवानगी देतांना पर्यावरण संवर्धनाचा विचार व्हावा फक्त गणेश उत्सवादरम्यान नको, असेही  त्यांनी म्हटले आहे.