Breaking News

बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेत विलीन करण्यास मान्यता

मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - रेल्वेच्या धर्तीवर बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यास काल (26) महापालिका सभागृहाने मान्यता दिली आहे. महापा लिकेच्या सभेत बेस्ट समिती अध्यक्षांनी हा ठराव मांडल्यानंतर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता तो मंजूर करण्यात आला. त्यामुळे हा ठराव आयुक्तांच्या माध्यमातून नगरविकास  खात्याकडे पुढील अभिप्रायासाठी पाठवण्यात आला आहे. या ठरावामुळे भविष्यात महापालिकेच्या अर्थसंकल्पासोबत बेस्टचा अर्थसंकल्प मांडला जाईल.
सध्या बेस्टचा अर्थसंकल्प ऑक्टोबर महिन्यात मांडला जातो. परंतु महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन केला असला तरी त्यांच्या आर्थिक स्वायत्तेला धक्का न  लावता केवळ अर्थसंकल्प सादर करणे व मंजूर करण्यातच बदल होणार आहे.
बेस्टची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने बेस्टचा अर्थसंकल्प महापालिका अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला  आहे. अर्थसंकल्प विलिनीकरणाच्या प्रस्तावाला बेस्ट समितीची मंजुरी मिळाली असून पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी तो गुरुवारी सादर केला होता. यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष  अनिल कोकीळ यांनी महापालिका सभेत मांडला. परंतु बेस्टचे महाव्यवस्थापक आणि बेस्ट समिती यांचे सर्व अधिकार अबाधित ठेवून विलीन करण्यात येणार्‍या या अर्थसंकल्पाबाबत  कोणत्याही नगरसेवकाने चकार शब्द काढला नाही. त्यामुळे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी हा ठराव मंजूर करून पुढील अभिप्रायसाठी आयुक्तांकडे पाठवला आहे.