Breaking News

सरकारने नोटीस बाजवलेल्या तरूणांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई, दि. 15, ऑक्टोबर - एखाद्या विषयाबाबत, धोरणाबाबत आपलं मत मांडल्यास पोलीस नोटीस कशी काय पाठवू शकतात, असा प्रश्‍न फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू, असे आश्‍वासनही पवारांनी यावेळी दिले.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात सरकारविरोधी लिखाणाच्या आक्षेपावरुन ज्या विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या गेल्या होत्या. त्या तरुणांनी आज मुंबईत शरद पवारांची  भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयात जी व्यक्ती सध्या ओएसडी म्हणून कार्यरत आहे, ती व्यक्ती अशा प्रकारांना कारणीभूत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयात काय चालतं, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचा सल्लाही पवारांनी दिला आहे.