Breaking News

शेती व्यवसाय सक्षम करण्यासाठी काटेकोर शेती हाच पर्याय

। किसान आधार संमेलन -2017, तांत्रिक सत्र । काटेकोर शेती  आधुनिक शेतीचा मूलतंत्र  डॉ.लवांडे

अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - शेतीसंबंधी सर्व बाबींमध्ये काटेकोर व्यवस्थापन आवश्यक आहे. शेती व्यवसाय सक्षम करण्यासाठी काटेकोर शेती हा एक शाश्‍वत  पर्याय आहे,  असे प्रतिपादन दापोलीचे माजी कुलगुरु डॉ. किसनराव लवांडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात संपन्न झालेल्या किसान आधार संमेलन-2017 च्या चौथ्या दिवशीच्या तांत्रिक चर्चासत्रात काटेकोर शेती पध्दती आणि कृषि आधारीत  जोड धंदे या विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. काटेकोर  शेतीच्या तांत्रिक सत्राचे अध्यक्षीयस्थानी डॉ. बाळासाहेब सावंत  कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे माजी कुलगुरु डॉ. किसनराव लवांडे होते. कृषि आधारीत जोड धंद्यांच्या अध्यक्षस्थानी बंगलुरु कृषि विद्यापीठाचे कुलगुरु  डॉ.यु.एच. शिवण्णा होते.
काटेकोर शेती पध्दती या तांत्रिक सत्रात अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. लवांडे म्हणाले, शेती व्यवसाय सक्षम करण्यासाठी काटेकोर शेती हा एक शाश्‍वत पर्याय  आहे. याद्वारे उत्पादन, उत्पादकता व गुणवत्ता राखणे शक्य आहे. तथापि, अधिक परताव्यासाठी शेतीसंबंधी सर्व बाबींमध्ये काटेकोर व्यवस्थापन आवश्यक असल्याचे  सांगितले. सहअध्याक्षिय भाषणात डॉ. के.व्ही. प्रसाद म्हणाले राज्याने काटेकोर शेती क्षेत्रामध्ये देशभरात लौकीक मिळवल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते के. एफ.  बायोफ्लांट, पुणेचे श्री. शरद पवार यांनी योग्य नियोजन व व्यवसायीक दृष्टीकोन ठेवून संरक्षित शेती करणे आवश्यक असल्याचे कृषि व्यावसायिकांना आवाहन केले.  या प्रसंगी इंजि. एस.बी. डेरे, श्री. मदन चौधरी, श्री. दरंदले, श्री. अंकुश पडवळे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.
कृषि आधारीत जोडधंदे या तांत्रिक सत्राचे सहअध्यक्ष माजी कुलगुरु डॉ. वाय.एस. नेरकर म्हणाले, शेतीला शेती पुरक उद्योगाची जोड दिली तर शेती फायदेशीर  ठरते. यामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, मधुमक्षीका पालन, गांडुळ खत निर्मिती, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग इत्यादी शेती पुरक उद्योग शेतकरी घेऊ शकतात.  यामुळे उत्पन्नाची शाश्‍वत हमी राहते. माजी अधिष्ठाता डॉ. भीमराव उल्मेक म्हणाले, शेतीला जोडधंदा म्हणून शास्त्रीय दृष्टीकोनातून पशुपालन व्यवसाय केला तर  शेतकर्‍यांना अधिकचे उत्पादन मिळते आणि पशुपालनापासून सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणावर मिळते. या सेंद्रिय खतामुळे जमिनीची सुपिकता टिकून राहते आणि  उत्पादनात वाढ होते. याप्रसंगी पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणीचे डॉ. नितीन मार्कंडेय, मत्स्य विभागाचे माजी सहाय्यक आयुक्त श्री. राजेंद्र डांगरे, भाग्यश्री  डेअरीचे कार्यकारी संचालक डॉ. संतोष सहाणे, प्रगतशील शेतकरी श्री. इंगळे यांनी यावेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. सदर सत्राकरीता श्री. भाऊसाहेब बर्‍हाटे,  संचालक, आत्मा व श्री. भास्करराव वरघुडे, अध्यक्ष, राहुरी तालुका संरक्षित शेती संघ, काटेकोर शेती विकास केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. एन.एन. फिरके, पशुसंवर्धन  व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. यु.वाय. भोईटे, डॉ. बी.बी. खुटाळ, डॉ. आर.जे. देसले  उपस्थित होते. या सत्रांना शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.