Breaking News

राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज पाठविण्याचे क्रीडामंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दिल्या जाणार्‍या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात  आले आहेत. तरी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पात्र व्यक्तींनी या पुरस्कारांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी आज  येथे केले.
तावडे म्हणाले की, राज्यशासनाच्या वतीने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारांमध्ये  उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), उत्कृष्ट  क्रीडा संघटक / कार्यकर्ता, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार इ. पुरस्कारांचा समावेश आहे.
सदर पुरस्कार हे 2014-15, 2015-16 आणि 2016-17 या तीन वर्षांसाठी देण्यात येणार आहेत.