Breaking News

सामाजिक कार्यकर्ते चिंतामणी कुलकर्णी यांचे निधन

कल्याण, दि. 28, ऑक्टोबर - टिटवाळा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ‘जनप्रबोधिनी’ या संस्थेचे संस्थापक चिंतामणी कुलकर्णी यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. ते 62  वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे टिटवाळ्यातील सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे.
चिंतामणी कुलकर्णी हे गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ टिटवाळ्यात राहत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या कुलकर्णी यांचा विविध संस्थांशी संबंध होता. त्यांनी  व्याख्यानमाला, कीर्तन महोत्सव, कविसंमेलने, संगीताचे कार्यक्रम आदी विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले होते.
‘जनप्रबोधिनी’ या वाचनामुळे त्यांनी ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजवली. मधू मंगेश कर्णिक, नामदेव ढसाळ, अशोक नायगावकर, शंकर वैद्य अशा अनेक नामवंत साहित्यिकांचे  कार्यक्रम कुलकर्णी यांनी घडवून आणले. ते स्वत: उत्तम वाचक व संगीताचे दर्दी होते. कल्याणमधील बैलबाजार स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या  पश्‍चात आई-वडील, मुले, बहिणी, सून असा परिवार आहे.