दिवाळीनंतरच औरंगाबादमधील खड्ड्यांची दुरूस्ती
औरंगाबाद, दि. 16, आक्टोबर - शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्डयांच्या दुरुस्तीसाठी महानगरपालिका प्रशासनाने 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे. याबाबत स्थायी समितीने अंदाजपत्रकास मंजुरी दिली. दिवाळीनंतर रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. शहरातील खड्ड्यांची दखल उच्च न्यायालयाने देखील घेतली. न्यायालयाने खड्डे बुजविण्याबाबत प्रशासनास खडसावले होते. मनपाच्या नुकत्याच झालेल्या स्थायी समिती बैठकीत रस्ते दुरुस्ती व पॅचवर्कच्या कामाचे 50 लाखांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. आता लवकरच पॅचवर्कच्या कामाची निविदा काढली जाईल. त्यानंतर रस्ते दुरुस्ती केली जाणार आहे. दिवाळीनंतर रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.