Breaking News

संपामुळे सातारा विभागाचे पावणेदोन कोटींचे नुकसान

सातारा, दि. 22 (प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या तीन दिवस सातारा विभागातील 11 आगारांतील  सुमारे 9 हजारहून अधिक लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील एसटीच्या फेर्‍या रद्द झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या  सातारा विभागाचे गेल्या 3 दिवसांत सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एसटीच्या कर्मचार संघटनांनी मंगळवारपासून विविध मागण्यांसंदर्भात संप पुकारला होता. सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर,  पारगाव खंडाळा, मेढा, कोरेगाव, दहिवडी, वडूज, फलटण या 11 आगारातील  820 बसेसच्या सुमारे 3 हजारहून अधिक ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या  मार्गावर फेर्‍या होतात. यातून सुमारे 50 लाख रुपयांचा महसूल एसटी महामंडळाला मिळत होता. तसेच दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुमारे 80 ते 90 लाख  रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनाला मात्र प्रवाशांची संख्या कमी असते. त्यामुळे या दोन दिवशी सुमारे 70 लाख रूपयांचा  महसूल मिळतो. मात्र कर्मचारी संपावर गेल्यामुळे सातारा विभागाचे गेल्या तीन दिवसात कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
सातारा आगारातून 249 मार्गावर  563 फेर्‍या दररोज होतात. कराड आगारातून 234 मार्गावर 496 फेया होतात. कोरेगाव आगारातून 133 मार्गावर  265  फेर्‍या होतात. फलटण आगारातून 116 मार्गावर 345 फेर्‍या होतात. वाई आगारातून 87 मार्गावर 274 फेया होतात. पाटण आगारातून 107 मार्गावर 174  फेर्‍या होतात. दहिवडी आगारातून 110  मार्गावर 149 फेर्‍या होतात. महाबळेश्‍वर आगारातून 76 मार्गावर 100 फेर्‍या होतात. मेढा आगारातून 94 मार्गावर  111 फेर्‍या होतात. पारगाव खंडाळा आगारातून 70 मार्गावर 95 फेर्‍या होतात. वडूज आगारातून 149 मार्गावर 236 फेर्‍या होतात. सातारा विभागातून 1  हजार 425 मार्गावर दररोज 2 हजार 808 फेर्‍या होतात. या सर्व फेर्‍या संपामुळे रद्द कराव्या लागल्याची माहिती एसटीच्या अधिकार्यांनी दिली. तसेच  दिवाळी हंगामात विविध मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता जादा एसटी बसेस सोडण्यात येतात. मात्र, दिवाळीच्या सणाच्या मुख्य दिवशी एसटीच्या  कर्मचार्‍यांनी केलेल्या संपामुळे सातारा विभागातील 11 आगारातील सुमारे 820 एसटी बसेस उभ्या राहिल्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागला.