Breaking News

दिल्ली येथून बेपत्ता झालेला जवान पुण्यात सुखरूप

खंडाळा, दि. 22 (प्रतिनिधी) : खंडाळा तालुक्यातील अक्षय भोसले हा जवान जम्मू येथे हजर होण्यास गेला होता. मात्र, जम्मू विमानतळावरून तो  युनिटमध्ये पोहचला नसल्याचे समजले. त्यानंतर जवानाच्या नातेवाईकांनी जम्मू येथे जाऊन शोध घेतला. त्यानंतरही तो न सापडल्याने खंडाळा पोलीस  ठाण्यात भोसले बेपत्ता झाला असल्याची तक्रार नातेवाईकांनी दाखल केली. गेल्या दोन दिवसांपूर्वी अक्षय पुण्यात पोहचल्याचे समजल्यानंतर त्याच्या  नातेवाईकांनी सुटकेचा श्‍वास घेतला. 
अक्षय भोसले हा जम्मू- काश्मिर येथे सैन्य दलात कार्यरत आहे. तो 29 सप्टेंबर रोजी रजेवर आला होता. सुट्टी संपवून कामावर हजर हजर होण्यासाठी तो  दि. 2 ऑक्टारेबर रोजी घरातून गेला होता. दिल्लीत पोहचल्यानंतर त्याने कुटुंबियांना कल्पना दिली. मात्र, दि. 8 रोजी अक्षय युनिटमध्ये आला नसल्याची  माहिती सैन्यदलाने अक्षयच्या कुटूंबियांना दिली. या प्रकाराने नातेवाईकांना चिंता लागली. त्याच्या नातेवाईकांनी जिल्ह्यातील काही नातेवाईक व जम्मु येथे  जाऊन त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. 14 दिवसांनंतर अक्षय पुन्हा घरी आल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. जम्मू येथील  विमानतळावर पोहचल्यानंतर युनिटमध्ये रिक्षाने निघाला होता. त्यावेळी संबधित रिक्षा चालकाने त्याच्या तोंडावर स्प्रे मारून बेशुध्द केले. अक्षयकडून एटीएम  व पिन नंबर घेऊन त्याला मारहाण करून पठाणकोट येथे सोडले. या ठिकाणी तो 8 दिवस बेशुध्द अवस्थेत होता. त्यानंतर पठाणकोट व तेथून दिल्ली,  नाशिक असा प्रवास केला. नाशिकवरून पुण्यात जाऊन तेथे असलेल्या नातेवाईकांकडे जाऊन घरच्या लोकांना अक्षय याने कल्पना दिली. नातेवाईकांनी  अक्षयला घरी आणले असून या प्रकारात त्याची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर तो सैन्य दलात पुन्हा रूजू होईल, असे त्याच्या वडिलांनी  सांगितले.