Breaking News

विरोधी पक्ष केवळ बघ्याची भूमिका - खा. संजय राऊत

पुणे, दि. 04, ऑक्टोबर - विरोधी पक्ष केवळ नावालाच उरला असून जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असलेले प्रश्‍न त्यांच्याकडून मांडले जात नाहीत. त्यामुळेच शिवसेना  सत्तेत असुनही विरोधी पक्षाची भुमिका पार पाडत आहे. चुकीच्या मुद्यावर शिवसेनेने सरकारला धारेवर धरत जनतेच्या मनातली खदखद बाहेर आणली. याऊलट  विरोधी पक्ष केवळ बघ्याची भूमीका घेत असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते  बोलत होते. यावेळी सरकारवर निशाणा साधत राऊत म्हणाले की, देशातील वातावरण पाहता निवडणूक लवकर होईल असे वाटते. त्यामुळे सद्यस्थितीत विधानसभा  आणि लोकसभेच्या निवडणुका जरी एकत्र झाल्या तरी शिवसेना निवडणुकीसाठी तयार असून निवडणुकीच्या चाहुलीने भाजपच्या थापा मारण्याची संख्या वाढली  असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पुण्यात शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून शहरातील शिवसेनेत लवकरच बदल  दिसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुका होणार असल्याच्या केलेल्या भाकीताबाबत बोलताना राऊत म्हणाले, शरद  पवार यांना निवडणुकीचे होकायंत्र म्हटले जाते. त्यामुळे सर्व गोष्टी त्यांना लवकर कळतात असे सांगत पवार हे मोदींचे राजकीय गुरू असल्याची आठवण त्यांनी करून  दिली.विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यात शिवसेनेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून पुण्यातील शिवसेनेत लवकरच बदल दिसतील. यामंध्ये मोठ्या प्रमाणात  फेरबदल होतील असा सुचक इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.