Breaking News

कीटकनाशक फवारणीवेळी झालेल्या शेतकर्‍यांच्या मृत्यूंच्या चौकशीसाठी समिती

मुंबई, दि. 04, ऑक्टोबर - यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान 18 शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या चौकशीसाठी गृह विभागाच्या अप्पर  मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला घटनेची कारणमीमांसा करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले  आहेत, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. श्री. फुंडकर म्हणाले की , ही घटना अतिशय दुःखद आणि  क्लेशदायक आहे. या घटनेबाबत राज्य सरकार संवेदनशील असून मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील पीडितांना2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या  चौकशीत दोषी आढळणार्‍यांवर तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिली.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान  योजनेसाठी जवळपास 56 लाख 59 हजार शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या जिल्ह्यातील बँकांनी तपशील दिले आहेत त्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या  बँक खात्यावर दिवाळीपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा होईल. तसेच जे शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत त्यांचा देखील दुसर्‍या टप्प्यात  फेरविचार करण्यात येणार आहे, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.