Breaking News

हिवाळी अधिवेशनावर धडकणार रिक्षा चालक-मालक महामोर्चा

पुणे, दि. 01, नोव्हेंबर - रिक्षा चालक-मालकांसाठी, कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, त्यांना वृद्धावस्थेत पेन्शन मिळावी, बेकायदेशीर ओला, उबेर सारख्या भांडवलदार कं पन्यांवर बंदी घालावी याकरता रिक्षा चालक-मालक आक्रमक झाले आहेत. या विविध मागण्यांसाठी राज्यातील 15 लाख रिक्षा चालक-मालकांच्या वतीने डिसेंबरमध्ये नागपूर येथे  होणार्‍या हिवाळी अधिवेशनावर महा मोर्चा काढण्यात येणार आहे.
पिंपरी येथील भक्ती कॉम्प्लेक्स येथे, रिक्षा संघटना पदाधिकार्‍यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष आणि कृती समितीचे  महाराष्ट्र सरचिटणीस बाबा कांबळे उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालक मालकांच्या मागण्यांचा पाठपुरावा केला जात आहे. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे,  यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे बाबा यावेळी म्हणाले. सभेचे पहिले सत्र पुणे रिक्षा फेडरेशन अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर दुसरे सत्र शिवनेरी रिक्षा  संघटनेचे अध्यक्ष अशोक सालेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी नवीन कार्यकारिणी तयार करण्यासाठी अध्यक्ष शशांक राव यांच्या आदेशानुसार सरचिटणीस बाबा कांबळे आणि कार्याध्यक्ष विलास भालेकर यांना अधिकार देण्यात आले. या शिवाय बरेच ठराव ही मंजूर करण्यात आले. हिवाळी अधिवेशनात होणार्‍या मोर्चात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील रिक्षा चालक-मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे  आवाहन कार्याध्यक्ष विलास भालेकर यांनी केले.