Breaking News

सांगलीतील 1346 शेतक-यांना साडे सहा कोटीचे अनुदान

सांगली, दि. 01, नोव्हेंबर - राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील एक हजार 346 शेतक-यांना सहा कोटी 52  लाख रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. मात्र या कर्जमाफी यादीत जिल्ह्यातील काही शेतकरी व सहकारी सोसायट्यांची नावे आल्याने काहीसा गोंधळ उडाला आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक लाख 71 हजार 687 शेतक-यांची माहिती कर्जमाफी यंत्रणेकडे सादर केलेली आहे. त्यातील एक हजार 136 शेतकरी या क र्जमाफीसाठी अपात्र ठरल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती घेता सांगली जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांनी अद्याप अपात्र शेतक-यांची क ोणतीही यादी प्रसिध्द झालेली नाही. त्यामुळे या एक हजार 136 शेतक-यांच्या अपात्रतेबाबतची माहिती चुकीची असल्याचे सांगितले.
कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे व दाखल अर्जांच्या छाननीत घोळ झाल्यामुळेच ही कर्जमाफी प्रक्रिया काहीशी लांबल्याचे सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले.  दीपावलीच्या पहिल्या दिवशी सांगली जिल्ह्यातील 28 शेतक-यांना कर्जमाफी योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर पाच दिवसांनी या शेतक-यांच्या बँक खात्यावर क र्जमाफीची रक्कम वर्ग झाली होती. सांगली जिल्ह्यातील एक हजार 346 शेतक-यांसाठी सहा कोटी 52 लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाले असून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्तही  झाले आहे. आता त्या अनुषंगाने शेतक-यांची यादी निश्‍चित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.