Breaking News

सनबर्न फेस्टिव्हल भारतातूनच हद्दपार करा

पुणे, दि. 04, ऑक्टोबर - मागच्या वर्षी ग्रामस्थांसह संस्कृतीप्रेमी पुणेकरांचा विरोध डावलून पार पडलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यंदाच्या वर्षी मोशी प्राधिकरण,  पिंपरी चिंचवड परिसरात होत असल्याचे वृत्त आहे तसेच कार्यक्रमाची तिकिटविक्री चालू असून यंदाही सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्येच या कार्यक्रमाचे  आयोजन होणार असल्याची चिन्हे आहेत. हा फेस्टिवल यंदाच्या वर्षी मोशी प्राधिकरण परिसरात सनबर्न फेस्टिव्हल आयोजित करण्यास कोणत्याही प्रकारची अनुमती  देऊ नये; अन्यथा समस्त ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ आणि संस्कृतीप्रेमी संघटना रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदुत्वनिष्ठ  संघटनांच्या वतीने देण्यात आली आहे.मोशी येथे होणा-या या सनबर्न फेस्टिवलमुळे पुण्यातील तरुण मुले-मुली चुकीच्या मार्गाला लागून या तरुणांसोबत पुण्यातील  अनेक कुटुंबे उध्वस्थ होतील. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी-देहू या संतभूमीतून, राज्याची सांस्कृतिक  राजधानी असलेल्या पुण्यातून आणि जगाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या भारतवर्षातून ‘सनबर्न फेस्टिव्हल’ हद्दपार करावा, अशी आग्रही मागणी या वेळी  करण्यात आली.पुण्यात यापूर्वी काही वर्षांपूर्वी सिंहगडाच्या पायथ्याशी रेव्ह पार्टी झाली होती, शहरातील उच्चभ्रू भागात अमली पदार्थांच्या तस्करांचे जाळे आहे. असे  असतांना ते उद्ध्वस्त करण्याऐवजी अशा अनैतिक कृत्यांना प्रोत्साहन देणारे ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होऊ देणे, हा सांस्कृतिक पुण्याचा अपमान आहे. सरकारने  ग्रामस्थांचा, संस्कृतीप्रेमी पुणेकरांच्या सहनशक्तीचा अंत न पहाता सनबर्न फेस्टिव्हलला हद्दपार करावे. या मागणीची नोंद घेतली गेली नाही आणि भावना दुखावल्याने  नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्याचे सर्वस्वी दायित्व सरकार आणि पोलीस-प्रशासन यांचे असेल, असाही इशारा हिंदू जनजागृती संघटनेकडून देण्यात आला आहे.