Breaking News

खेळपट्टीचे फिक्सिंग ; क्युरेटर पांडुरंग साळगावकरांवर निलंबनाची कारवाई

पुणे, दि. 26, ऑक्टोबर - भारतविरूद्ध न्यूझीलंड दुसर्‍या वनडे सामन्यापूर्वी खेळपट्टीचे फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून पिच क्यूरेटर पांडुरंग साळगावकर यांच्यावर यांच्यावर  निलंबनाची कारवाई करण्यात आली . एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब समोर आल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे भारत आणि  न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, ठरल्याप्रमाणे सामना खेळवण्यात आला . क्युरेटर साळगावकर यांचे निलंबन क रण्यात आले आहे.
बीसीसीआयने या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत पांडुरंग साळगावकर यांचे निलंबन केले आहे. या प्रकरणानंतर बीसीसीआयच्या पिच क्युरेटरने खेळपट्टीची तपासणी केली. खेळपट्टी  खेळण्या योग्य असल्याचा त्यांनी निर्णय दिला. यामुळे आजचा सामना रद्द होणार नाही. एका वृत्तवाहिनीने पांडुरंग साळगावकर यांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. ज्यामध्ये पत्रकारांनी  सट्टेबाजांचे सोंग घेऊन क्युरेटर साळगावकरांकडे एक अशी खेळपट्टी मागितली, ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघांतील वेगवान गोलंदाजांना अनुकूलता मिळेल. या मागणीला क्युरेटर पांडुरंग  साळगावकर यांनी सहमती दिल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. तसेच सामन्यापूर्वी साळगावकर या पत्रकारांना मैदानात पिच दाखवायला घेऊन गेले. आयसीसीच्या  नियमांनुसार सामन्यापूर्वी अधिकार्‍यांव्यतिरिक्त कुणालाही मैदानात प्रवेश देण्यात येत नाही, मात्र नियम धाब्यावर बसवून साळगावकर या सोंग घेतलेल्या सट्टेबाजांना पिचवर घेऊन  गेले. खेळपट्टीवर 337 ते 340 इतक्या धावा होतील आणि त्याचा पाठलाग करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी म्हटले.क्रिकेटला स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंग आदी कलंक  लागले होते. त्यातून बाहेर पडत असताना हा प्रकार घडल्यामुळे क्रीडा रसिक निराश झाले आहेत.