Breaking News

उपनिरीक्षकासह शिपाई 15 हजाराची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

पुणे, दि. 26, ऑक्टोबर - बलात्कार प्रकरणी तुरूंगात असलेल्या आरोपीला जामीन मिळवून देण्याकरिता कोर्टात आरोपीच्या बाजुने अहवाल पाठविण्यासाठी 15 हजार रुपये  लाचेची मागणी करून ती स्वीकारताना कोंढवा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती मोरे यांच्यासह शिपायाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई बुधवारी दुपारी तीन  वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.स्वाती मोरे (वय- 34) आणि हर्षल शिवरकर (वय-32) अशी रंगेहाथ ताब्यात घेतलेल्या पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत.या प्रकरणी तक्रार  दिलेल्या व्यक्तीच्या वडिलांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी कोर्टात आरोपीच्या बाजुने रिपोर्ट पाठविण्यासाठी ही  लाचेची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम पोलीस शिपाई हर्षल शिवरकर याने स्वाती मोरे यांच्या समक्ष कोंढवा पोलीस ठाण्यातच स्वीकारली. यावेळी सापळा लावून थांबलेल्या  लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांवरही कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.