Breaking News

शहरातील धार्मिक स्थळांवर कारवाई पूर्वी फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी

अहमदनगर, दि. 28, ऑक्टोबर - उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शहरात धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी केलेले चुकीचे सर्व्हेक्षण व नि:पक्षपातीपणे कारवाई होत  नसल्याच्या निषेधार्थ हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. या प्रश्‍नासंदर्भात उपायुक्तांशी चर्चा करण्यात आली. या आंदोलनात  शहर जिल्हाध्यक्ष परेश खराडे, शहर प्रमुख घनश्याम बोडखे आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील धार्मिक स्थळांवर महापालिकेकडून कारवाई करण्याच्या हालचाली सुरु आहेत. मनपा अधिका-यांनी कार्यालयात बसून  चुकीच्या पध्दतीने सर्व्हेक्षण केल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्व्हेक्षणावर यापुर्वी देखील आक्षेप घेण्यात आला असून यामधील त्रुटी  निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. रस्त्याला अडथळा ठरणा-या शहरातील 104 धार्मिक स्थळाची यादी मनपाने सर्व्हेक्षण करुन तयार केली आहे. त्यातील 31  धार्मिक स्थळे 1960 पूर्वीची असल्याचा निष्कर्ष काढून सदर यादी राज्यस्तरीय समितीकडे पाठविली आहे. तर खाजगी जागेत असलेले पाच धार्मिक स्थळांचा समावेश  यादीत झाल्याने मनपाने केलेले सर्व्हेक्षण चुकीचे झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईत केवळ हिंदू धर्मियांची श्रध्दास्थान  असलेल्या मंदिरांचाच समावेश असल्याने धार्मिक भावना दुखावली जाणार आहे. धार्मिक स्थळावरील कारवाई निपक्षपणे होण्याची आवश्यकता आहे. इतर धर्मियांच्या  धार्मिक स्थळांना कारवाईतून वगळण्यात येऊन महापालिकेच्या वतीने हिंदूच्या मंदिरावर कारवाई केली जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे हिंदू धर्मियांमध्ये रोष  निर्माण होऊन सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता असून कारवाई करण्यापूर्वी झालेले चुकीचे सर्व्हेक्षणाची फेरसर्व्हेक्षण करुन शासनाकडे सादर करण्यात आलेल्या  यादीचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.