Breaking News

अंगावर ट्रॅक्टर घालणा-या वाळू माफियांवर प्रशासनाचा खड्ड्यांचा उतारा

जालना, दि. 01, नोव्हेंबर - बेमुर्वतखोरपणे अधिका-यांच्या अंगावर टॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांनी केल्याने चवताळलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी  गोदापात्रात जाणा-या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत. त्यामुळे आश्‍चर्यकारकरित्या वाळू माफियांना पायबंद बसल्याचे चित्र दिसू लागले आहे. जायकवाडीतून सोडण्यात  आलेले गोदापात्रातील पाणी ओसरताच परिसरातील अवैध वाळू तस्करांनी आपला मोर्चा गोदावरी नदीपात्रातील पाणीदार वाळू चोरण्याकडे वळवला होता. दोन दिवसांपूर्वी तलाठी अ भिजित देशमुख अवैध वाळूचे टॅक्टर अडवत असताना वाळू भरलेला टॅक्टर चालकाने तलाठी अभिजित देशमुख यांच्या अंगावर घालत पळवुन नेला. यावेळी प्रसंगावधान राखून  तलाठी अभिजित देशमुख बालंबाल बचावले. त्यानंतर मंडळाधिकारी कृष्णा एडके, व तलाठी अभिजित देशमुख यांनी गोदापात्रातून अवैध वाळू तस्करीच्या रस्त्यावर जेसीबी यंत्रांद्वारे  पाच ठिकाणी दहा दहा फुटीर खड्डे केले आहेत. त्यामुळे शहागड-वाळकेश्‍वरची अवैध वाळूतस्करीला लगाम बसला असून अवैध वाळू वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.