Breaking News

लक्ष्मीपुजनापुर्वीच गृहलक्ष्मी कडाडली

अहमदनगर, दि. 19, ऑक्टोबर - हवामानखाते, वातावरणातील बदल, गारपीट, कोलमडलेले बाजारभाव तर कधी कधी महावितरणची वीज दरवर्षी शेतकर्‍यांची सत्वपरिक्षा बघत असते. यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारली काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले तर काहींच्या पदरी खराब बियाणे पडले.या सर्व चक्रव्युहातून बाहेर पडुन ज्यांच्या तोंडी घास आला तोही परतीच्या पावसात आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत निघुन गेल्यामुळे कापणी केलेले पिकही पाण्यात गेल्यामुळे गावपुढार्‍यांवर लक्ष्मीपुजणापुर्वीच गृहलक्ष्मी कडाडली असल्याचे चित्र ग्रामपंचायत निवडणूक पार पडलेल्या गावात बघण्यास मिळत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची नशा सगळ्याच गटा-तटाच्या गावपुढार्‍यांना चांगलीच चढली होती.यामुळे पायात घुंगरु बांधुन दररोज गावगाड्याच्या मतांची गोळाबेरीज करण्यास सर्वच पुढारी व्यस्त होते.अशावेळी जेवणावर तिलांजली सोडलेल्या गड्यांपुढे बोलायची गृहलक्ष्मीचीही हिंमत नव्हती.त्यात उमेदवारांचे तर संपुर्ण कुटुंबच या कामी लागल्याने काढणीला आलेले सोयाबीन,भुईमुग,बाजरी,मका या पिकांना मतमोजणी नंतरचा मुहुर्त देऊ म्हणता म्हणता त्याच काळात परतीच्या पावसाने सर्वच खरीप पिकांचा नाश झाला.आता रब्बीसाठी शेत तयार करायच तर दिवाळीमुळे मजुर मिळेना त्यात पराभव पत्करलेल्या उमेदवारांची प्रतिष्ठा तर वाढली नाही उलट  राजकारण चुलीतं घाला अगोदर शेतातलं पदरात पाडून घ्या त्यावेळी अस्स म्हणणारी गृहलक्ष्मी आता कारभार्‍याच्या डोक्यावर खापर फोडून मोकळी झाली आहे. गावपुढार्‍यांच्या निवडणूक आणि पिकावर पाणी फेरले असल्याने यंदाचा खरीप हंगामही मातीला मिळाला असल्याचे ग्रामीण भागात चित्र दिसुन येत असले तरी निवडणूक पार पडली असुनही कामधंदा सोडुन हौस म्हणुन उमेदवारी अर्ज भरणारे,पराभूत आणि निवडून आलेल्या सर्वच पुढार्‍यांना नऊ नोव्हेंबरच्या आत आपला खर्चाचा हिशोब देऊनच घरच्या कामाला लागावे लागणार आहे.