Breaking News

किसान क्रांतीची आत्मचिंतन बैठक उत्साहात

अहमदनगर, दि. 19, ऑक्टोबर - किसान क्रांतीच्या राज्यस्तरीय समन्वय समितीची आत्मचिंतन बैठक संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील कीटकनाशकच्या प्रादुर्भावाने बळी पडलेल्या शेतकर्‍याना श्रद्धांजली वाहण्यात आली. आत्मचिंतन बैठकीमध्ये जुनी राज्यस्तरीय समन्वय समिती व कृती समिती बरखास्त करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. किसान क्रांतीचा लोगो व किसान क्रांती हे नाव समन्वय समितीच्या परवानगीशिवाय कुणीही वापरू नये तसेच समन्वय समितीच्या पूर्व परवानगीशिवाय कोणताही उपक्रम अथवा आंदोलन पुकारू नये. यापुढे किसान क्रांती (शेतकरी संप) जनांदोलनाचे केंद्र पुणे राहील,  असे ठरविण्यात आले. दरम्यान, पुणतांबा येथील शेतकर्‍यांच्या एका गटाने 20 ऑक्टोबर रोजी बलीप्रतीपदेच्या दिवशी मेळावा ठेवला आहे. मुळात किसान क्रांती जनांदोलन ही चळवळ गटबाजी व स्थानिक राजकारणापासून दूर आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये किसान क्रांतीच्या राज्य समन्वय समितीचा कोणताही सहभाग असणार नाही. मात्र संपूर्ण गावाने तसेच गावातील सर्व राजकीय गटांनी एकत्रित चळवळ किंवा आंदोलन सुचवले तर निश्‍चित राज्यपातळीवर उपक्रमांचा विचार करण्याचे या बैठकीत ठरले. किसान क्रांतीच्या समन्वय समितीबरोबर संपर्क ठेवण्यासाठी सतीश कानवडे यांचेकडे जबाबदारी देण्यात आली.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारबरोबर चर्चा घडवून आणणे, स्वस्तदरामध्ये निविष्ठा व सामुग्री उपलब्ध होण्यासाठी किसान जन सुविधा केंद्रांची उभारणी करणे, दि.30 जून 2017 पर्यंतचे थकीत कर्जदारांची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये समावेश करून घेणे,  दुधाचे भाव काही दुधसंघानी सूड भावनेतून कमी केले असल्याचे निदर्शनास आले असून अशा दूध संघांवर कारवाई करणे, हमीभाव कायद्याबाबत सरकारकडून आश्‍वासनाची पूर्तता झाली नसून असा कायदा तातडीने आणणे अशा सर्व मागण्या शासनापुढे मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.