पेट्रोलपंप चालकांचा शुक्रवारी एक दिवसीय देशव्यापी संप
पुणे, दि. 08, ऑक्टोबर - आपल्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (एपीडा) आणि त्यांच्याशी संलग्न असणा-या संस्थांतर्फे येत्या शुक्रवारी (दि. 13) देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. नवीन विपणन मार्गदर्शक तत्वे एकतर्फी आणिल डिझेल विक्रेत्यांसाठी अतिशय हानिकारक आहेत. त्याबाबत विक्रेत्यांसोबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे या तत्वांमध्ये दोन्ही बाजूंनी विचार करून नवीन नियमावली तयार करण्यात यावी. तीन संघटनांच्या संयुक्त मंचाने 4 नोव्हेंबर 2016 रोजी तेल कंपन्यांशी एक करार केला आहे, ज्यामध्ये विक्रेत्यांच्या वैध मागण्या पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, त्याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. तसेच संघटना पेट्रोलियम उत्पादनांची घरपोच सेवा देण्याच्या विरोधात आहे.वरील मागण्या मान्य करण्यासाठी एपीडा आणि त्यांच्या सहकारी संस्थांच्या वतीने येत्या शुक्रवारी (दि. 13) एक दिवसीय राष्ट्रीय संप करण्यात येणार आहे. या एकदिवसीय संपानंतर जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 27 ऑक्टोबर पासून अनिश्चित कालावधीसाठी संप पुकारण्यात येणार असल्याचे एपीडाकडून सांगण्यात आले आहे.