Breaking News

मिरजेत मोबाईल दुकान फोडून पाच लाखाचा माल लंपास

सांगली, दि. 05, ऑक्टोबर - मिरज शहरातील भारत इलेक्ट्रिकल्स व मोबाईल्स हे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व मोबाईल असा एकूण सव्वा पाच  लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. मुख्य बाजारपेठेतील दुकान चोरट्यांनी फोडल्याने व्यापारीवर्गात एकच खळबळ उडाली आहे.
मिरज शहरातील हायस्कूल रस्ता येथे वासुदेव मेघानी यांचे भारत इलेक्ट्रिकल्स व मोबाईल्स हे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य व मोबाईल विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी  मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या दुकानाच्या मागील बाजूस असलेले लोखंडी ग्रील व लाकडी दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला व या दुकानातील लोखंडी  तिजोरी व कॅश काऊंटरमधील रोख चार लाख 62 हजार रूपयांसह चार हजार रूपये किंमतीची चांदीची दहा नाणी व 53 हजार रूपये किंमतीचे सहा मोबाईल चोरून  नेले.
वासुदेव मेघानी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यास आले असता तिजोरी उघडी असल्याचे व त्यातील रक्कम चोरीला गेल्याचे सामोरे आले. त्यांनी तात्काळ ही माहिती  मिरज शहर पोलिस ठाण्यात दिली. मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरूवात केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्‍वानपथकालाही पाचारण  करण्यात आले. मात्र श्‍वानाने दुकानामागील बाजूने पुढील रस्त्यापर्यंत माग काढला. या चोरीनंतर हे चोरटे वाहनातून पसार झाल्याचा अंदाज मिरज शहर पोलिसांनी  व्यक्त केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वासुदेव मेघानी यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.