Breaking News

जनआक्रोशाचे वादळ सत्ता उलथवून लावेल - गुलाब नबी आझाद

मुंबई, दि. 01, नोव्हेंबर - केंद्र आणि राज्य सरकार विरोधातील जनआक्रोशाचे वादळ देशाची फसवणूक करणार्‍या मोदी सरकारची सत्ता उलथवून लावेल, असा इशारा राज्यसभा  विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद यांनी आज अहमदनगर येथे काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चा प्रसंगी बोलताना दिला. 
केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले असून, त्याअंतर्गत राज्यातील सहा  विभागात मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. आज अहमदनगर येथे उत्तर महाराष्ट्र विभागाच्या जनआक्रोश मेळाव्याच्या माध्यमातून आंदोलनाचा प्रारंभ झाला.
गुलाब नबी आझाद म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात अहमदनगर शहराचे ऐतिहासिक योगदान आहे. याच भूमीत ब्रिटीश राजवट उलथवून टाकण्याचे निर्णय झाले. आज शेतकरी आणि  सर्वसामान्य जनतेच्या आक्रोशाचे वादळ निर्माण झाले आहे. जनतेला वेठीस धरणारे भाजप-शिवसेनेचे सरकार पायउतार केल्याशिवाय हे वादळ शांत होणार नाही.
राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले, केंद्रात आणि राज्यात सध्या शेतकरी विरोधी सरकार असून, त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत, स्वातंत्र्य लढ्यात  ज्या लोकांनी इंग्रजांची दलाली केली, ते सत्तेत बसून आज आम्हाला देशभक्ती शिकवू पाहत आहेत. भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. गेल्या तीन  वर्षापासून शेतमालाला हमीभाव नाही. नोटाबंदीसारखा तुघलकी निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरूण जेटली यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले. पंतप्रधान नरेंद्र  मोदी हे परदेशी शक्तींच्या इशार्‍यावर नाचत आहेत. मोदी सरकारच्या काळात बँकांचा एनपीए 5 लाख 76 हजार कोटींनी वाढला आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, हा जनआक्रोश मेळावा म्हणजे उद्याच्या विधानसभा निवडणूकीची नांदी आहे, भाजपाने देशाचा आणि राज्याचा बट्याबोळ केला असून, आता त्यांच्या  परतीचा प्रवास नांदेडपासून सुरु झाला आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, , जनआक्रोश मेळाव्याच्या निमित्ताने सरकार विरोधातील खरा लढा आता सुरु झाला. विकासाच्या नावाखाली देशाची आणि राज्याची  फसवणूक होत आहे.