Breaking News

गोरेगावात विजेच्या धक्क्याने मायलेकाचा मृत्यू

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - आकाशकंदिलातून निघालेल्या विजेच्या धक्क्याने गोरेगाव परिसरातील मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी  रात्री ही घटना घडली. प्रियांका भारती (वय 27) व प्रिन्स (वय 6) असे मृत्यू झालेल्या मायलेकांचे नाव आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी अपघाती  मृत्यूची नोंद केली आहे.
भारती या गृहिणी असून त्या गोरेगाव पूर्व भागातील बिंबीसार नगर येथील म्हाडा कॉलनीत पती, एक मुलगा व एका मुलीसोबत रहात होत्या. शुक्रवारी रात्री  घराच्या गॅलरीत त्या प्रिन्ससोबत बसल्या होत्या. तेथे लावलेल्या आकाशकंदिलातून अचानक विद्युतप्रवाह वाहून संपूर्ण ग्रीलला विजेचा शॉक लागू लागला.  त्या ग्रीलवरच बसल्या असल्याने प्रियांका व त्यांच्या मुलाला विजेचा जोरदार धक्का लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला. ऐन दिवाळीत भारती कुटुंबात  शोककळा पसरली.