Breaking News

कास परिसरातील अवैध बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल

सातारा, दि. 28, ऑक्टोबर - कास परिसरातील 13 अवैध बांधकाम धारकांवर महसुलकडून गुन्हे दाखल करण्यात करण्यात आल्याची माहिती तहसिलदार निलप्रसाद चव्हाण यांनी  दिली. दरम्यान पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता अवैध बांधकाम धारकांवर कायदेशीर फास आवळण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास परिसरात अवैध बांधकामांचा सुळसुळाट झाला होता. याबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. शिवतारेंनी चार  महिन्यांपूर्वी या भागाची पाहणी करून या धनदांडग्यांच्या मुजोरीला लगाम घालण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. तदनंतर प्रशासनाने कारवाईचे कागदीघोडे नाचवले.  प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी सुमारे 30 बांधकामधारक न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने फटकरल्यावरही प्रशासन गप्प होते. दरम्यान कास रस्ता खचल्यानंतर  दुरुस्ती करणार्या ठेकेदाराला पळवून लावल्याने ग्रामीण-डोंगरी भागातील नागरिकांना त्रास होत असल्याने पत्रकारांनी आक्रमक होत पालकमंत्र्यांना धारेवर धरल्यावर ना. शिवतारेंनी  जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकार्यांना खडेबोल सुनवत कारवाई करण्याचे आदेश देताना कासप्रकरणी विचारणा केली होती. पालकमंत्री शिवतारे शनिवार, 28 रोजी नियोजन  समितीची बैठक असल्याने सातार्यात आहेत. त्यापूर्वीच 13 अवैध बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खरेतर या भागातील सरसकट 96 अवैध बांधकामांवर गुन्हे  दाखल करणे क्रमप्राप्त असताना हा कारवाईचा फार्स करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या असून यातून प्रशासन काय सिद्ध करणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. असे असले तरी  पालकमंत्र्यांना उत्तर देण्यासाठी 13 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करून जुजबी कारवाई न करता ठोस धडक कारवाई करून बेकायदेशीर इमले उभारणार्यांवर कायद्याचा दंडुका  उगारावा अशी मागणी सातारकर करत आहेत.