Breaking News

जनमत भाजविरोधात ; कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे -पवार

मुंबई, दि. 03, ऑक्टोबर - वाढती महागाई , शेतकर्‍यांची फसवी कर्जमाफी , वाढती बेरोजगारी आदी मुद्द्यांमुळे केंद्रातील आणि राज्यातील भाजप  सरकारविरोधात जनमत तयार होत आहे . त्याचा फायदा घेण्यासाठी पक्ष संघटनेने सज्ज राहिले पाहिजे . भाजप शासित राज्यांमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा  निवडणुकाही होण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे , असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले . 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज येथे झालेल्या बैठकीत बोलताना पवार यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले . या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते  म्हणाले की , बुलेट ट्रेनचा प्रकल्प अजिबात व्यवहार्य नाही . बुलेट ट्रेन साठी महाराष्ट्राला 25 हजार कोटी एवढी प्रचंड गुंतवणूक करावी लागणार आहे. बुलेट ट्रेनचा  फक्त 35 मिनिटे प्रवास महाराष्ट्रातून होणार आहे . एवढी मोठी गुंतवणूक करून महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडणार नाही. एवढी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी  मुंबईतील उपनगरी प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे . या वेळी पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी बुलेट ट्रेन बाबत  पंतप्रधान होण्यापूर्वी काय भाष्य केले होते याची ध्वनीफीत ऐकवली .
ते पुढे म्हणाले की , जपानमध्ये सध्या मोठी मंदी आहे. बुलेट ट्रेन उत्पादक कंपन्यांनाही या मंदीचा फटका बसलेला आहे. मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु झाली  तर जपानमधील या कंपन्यांचाच फायदा होणार आहे. फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी आहे अशी टीकाही पवारांनी यावेळी केली .  फडणवीस सरकारने सुरुवातीला शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते. असे असताना शेतकर्‍यांना कर्जमाफीचा फायदा मिळवण्यासाठी निकष का  लावण्यात आले , असा सवाल पवारांनी केला . सध्या सर्वच क्षेत्राची स्थिती चिंताजनक बनली आहे. गुंतवणूक आटत चालल्याने बेरोजगारी वाढत चालली आहे .  शेतकरी आत्महत्याही थांबत नाहीयेत. अनेक उद्योगधंदे बंद पडत असल्याने अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक वळणावर आली आहे , असेही पवारांनी नमूद केले.