Breaking News

लोडशेडिंग विरोधात राष्ट्रवादीकडून महावितरण शहर अभियंताना कंदील व मेणबत्तीची भेट

नाशिक, दि. 07, ऑक्टोबर - ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिककरांवर लादलेले वीज भारनियमन विद्युत महावितरण कंपनीने त्वरित रद्द करावे याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व त्यांच्या शिष्टमंडळाने वीज महावितरण कंपनीच्या शहर अभियंताना दिले. निवेदनासोबतच कंदील व मेणबत्तीची भेटही यावेळी अभियंताना देण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिककरांना कोणतीही पूर्व सूचना न देता भारनियमन लादल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. राज्यात पुरेशी वीज आहे. त्यामुळे नाशिक शहराला वीज भारनियमन होणार नाही, असे महावितरण कंपनीने अगोदरच कळवले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शहरात विजेचा लंपडाव सुरु झालेला आहे. या भारनियमनामुळे शहरातील व्यापार व उद्योगास कोट्यावधीचा फटका बसणार आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचे विविध ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन, बुस्टर पंपिंग स्टेशन आहेत. वीज भारनियमानमुळे जलशुद्धीकरण केंद्रावरील पाणीपुरवठा शुद्धीकरण प्रकियेत अडथळे येत असून, शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. सकाळच्या वेळी कामाला जाण्याची घाई असताना वीज जाते. तसेच रात्री स्वयंपाक करण्याच्या वेळीही वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील जनता ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त असताना भारनियमन सुरु केल्याने नागरिकांचा प्रचंड संताप होत आहे.
शेतकर्‍यांनाही कुठलीही पूर्व सूचना न देता हि लोडशेडिंग सुरु केल्याने शेतकर्‍यांना शेतात पाणी सोडणे अवघड झाले आहे. परीक्षा तोंडावर असताना भारनियमनमुळे अभ्यास होत नसल्याने विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. बचतगटासाठी दिवाळी एक पर्वणी असते. दिवाळीतील फराळ विक्रीतून अनेक बचतगटांना उभारी मिळत असते परंतु या भारनियमनामुळे बचतगटांचे नुकसान होणार आहे. या भारनियमनामुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थीसह सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. नाशिकमधील नियोजित वीज भारनियमन त्वरित रद्द करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र जनांदोलन छेडण्याचा इशाराहि यावेळी देण्यात आला.
यावेळी शहर सरचिटणीस संजय खैरनार, विद्यार्थी अध्यक्ष गौरव गोवर्धने, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष प्रशांत खरात,डॉ.अमोल वाजे, अ‍ॅड. सुरेश आव्हाड, अ‍ॅड.चिन्मय गाढे, सुनील महाले, अशोक मोगल-पाटील, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, किशोर शिरसाठ, मनोहर कोरडे, प्रशांत वाघ, योगेश दिवे, अनिल परदेशी, अल्ताफ पठाण, मुन्ना अन्सारी, राहुल तुपे, भूषण गायकवाड, विद्यासागर घुगे, तुषार वाघ, सागर वाघ, सुकदेव शिरसाठ आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.