Breaking News

’केडीएमटी’मधून दिव्यांगांना मोफत प्रवासाची सुविधा मिळवून देणार - खा.शिंदे

डोंबिवली, दि. 15, ऑक्टोबर - बेस्ट आणि टीएमटीच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या केडीएमटीमधूनही दिव्यांगांना विनामूल्य प्रवासाची सुविधा मिळवून देण्यासाठी महापौर तसेच आयुक्तांकडे पाठपुरावा कारण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे दिली. खा. डॉ. शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिव्यांग सहायता शिबिराच्या दुसर्‍या दिवशी, शनिवारी 1100 दिव्यांगानी शिबिराचा लाभ घेतला असून दोन दिवसांत अंदाजे सव्वा दोन हजार लाभार्थ्यांची तपासणी झाली आहे.
समाजात वावरताना दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जीवनावश्यक साधने घेणे देखील पैशांअभावी अनेकांना परवडत नाहीत,यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे खा. डॉ. शिंदे म्हणाले. खा. डॉ. शिंदे यांनी दिव्यांगांच्या या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करत कल्याण लोकसभा क्षेत्रातआयोजित केलेल्या या शिबिरांबद्दल दिव्यांग व्यक्तींनी समाधान व्यक्त केले.
या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व अत्यावश्यक साधने वाटपासाठी नाव नोंदणी व मोजमाप प्रक्रिया होणार असून साधारण महिन्याभराने पुन्हा शिबिराचे आयोजन करून त्यात साधनांचे वाटप केले जाणार आहे. खा. डॉ. शिंदे यांच्या खासदार निधीतून अंबरनाथ येथील प्रवीण जोशी,डोंबिवली येथील दत्तात्रय सांगळे आणि उल्हासनगर येथील मंगल उल्बी या दिव्यांगांना तीन चाकी स्कूटर खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली; तसेच,कळवा येथील शरद पवार आणि दिवा येथील संतोष वानखेडे यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. खासदार निधीचा अशा प्रकारे वापर केल्याबद्दल उपस्थितांनी खा. डॉ. शिंदे यांचे कौतुक केले.
केंद्र सरकारच्या केंद्रीय सामाजिक न्याय खात्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या मदतीने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून केंद्र शासनाच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अ‍ॅलिम्को) या कृत्रिम अवयव बनवणार्‍या कंपनीचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्याचप्रमाणे धर्मवीर दिव्यांग सेनेचे शरद पवार, अपंग सुश्रुषा सेवा संघाचे अरुण जाधव, हमराही एज्युकेशन ट्रस्टच्या नूरिया खान, अपंग सेवा संघाचे भरत खरे, अपंग साधना संघ, अपंगालय आणि जिल्हा रुग्णालयाचेही मोलाचे सहकार्य या शिबिरांना लाभले आहे.  (रविवारी) खिडकाळेश्‍वर मंदिर,खिडकाळी व झमझम हॉल, खडी मशीन रोड, कौसा-मुंब्रा या ठिकाणी ही शिबिरे होणार असून आज वेळेअभावी येऊ न शकलेल्या दिव्यांग व्यक्ती देखील या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेऊ शकतील, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.