Breaking News

राज्यात दिवाळीआधी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत

मुंबई, दि. 06, ऑक्टोबर - राज्यात वितरीत होणा-या पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करण्याबाबत विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून  दिवाळीआधी दर कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले . .
केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी) दोन रुपयां नी कमी केले. यानंतर प्रत्येक राज्यातील सरकारांनीही आपापले  कर कमी करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले. केंद्र सरकारच्या आवाहनाशी सरकार सहमत असून कर कमी करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक  आहे, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
पेट्रोलवरील कराच्या माध्यमातून वर्षाला 7 हजार 300 कोटी रुपये, तर डिझेलवरील कराच्या माध्यमातून 10 हजार 500 कोटी रुपये महसूल सरकारला मिळतो.  पेट्रोलवरील 1 रुपया मूल्यवर्धित कर कमी केला, तर राज्याचे 400 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. तर डिझेलवरील 1 रुपया मूल्यवर्धित कर कमी केला तर 1  हजार 200 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. एकीकडे इंधनाच्या वाढत्या दरानुसार जनतेत संतापाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे कर कमी केल्यास सरकारच्या  महसुलाची हानी होणार आहे.