Breaking News

गर्भपातासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली, दि. 28, ऑक्टोबर - गर्भपातासाठी पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही. किंबहुना, पत्नी गर्भधारणेसाठी तयार नसल्यास पती तिला जबरदस्ती करु शकत नाही, असे  सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अशाच प्रकारचा निर्णय पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दिला होता, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
पंजाब-हरियाणा उच्च न्यायलयात 2011 साली अनिल कुमार मल्होत्रा या व्यक्तीने याचिका दाखल केली होती. त्यानुसार, गर्भपात केल्याप्रकरणी मल्होत्रा यांनी त्यांची पत्नी सीमा  मल्होत्रा, डॉक्टर आणि पत्नीच्या माहेरच्या मंडळींकडून 30 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र त्यावेळी उच्च न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निर्णय दिला होता. 2011 साली  पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने निर्णय देताना म्हटले होते, स्त्री ही काही मशीन नाहीत, ज्यातून एखादा कच्चा माल टाकून प्रॉडक्टची अपेक्षा कराल. बाळाला जन्म देण्यासाठी  महिला मानसिकरित्या तयार असली पाहिजे.