Breaking News

तीन हजार महिला अवैध ठरविल्याने सिनेट निवडणूक वादग्रस्त

औरंगाबाद, दि. 17, ऑक्टोबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसभा निवडणूक मतदारयादीमुळे वादग्रस्त ठरली आहे. नाव जुळत नसल्यामुळे जवळपास  तीन हजार महिला मतदारांना अवैध ठरवले आहे. महिलांचे विवाहापूर्वी आणि नंतर नाव वेगळे असल्यामुळे अवैध ठरवू नये अशी मागणी संघटनांनी केली होती. याबाबत कुलगुरूंनी  आदेश देऊनही दुरूस्तीपत्रकात जुनाच नियम कायम ठेवल्याने महिला मतदार वैध ठरण्याची शक्यता नाही. विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या पदवीधर गणाच्या मतदारयादीत नोंदणी  करण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांचे अर्जावरील नाव, पदवी प्रमाणपत्रावरील नाव आणि रहिवासी पुराव्यावरील नाव जुळत नसल्याने अवैध ठरवण्यात आले आहे. विवाहापूर्वी महिला  मतदाराचे नाव आणि विवाहानंतरचे नाव वेगळे असते. पदवी प्रमाणपत्रावरील नाव आणि रहिवासी पुरावाव्यावरील नाव जुळणे शक्य नसल्याचे प्राध्यापक संघटनांनी विद्यापीठ  प्रशासनाला वारंवार सांगितले. याबाबत बामुक्टो, बामुक्टा, विद्यापीठ उत्कर्ष पॅनेल यांनी गुरुवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली होती. केवळ नाव जुळत नसल्याचे क ारण दाखवून महिला मतदारांना अवैध ठरवणे योग्य नाही. मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवू नका, अशी मागणी संघटनांनी केली होती. शिष्टमंडळ दालनात असताना कुलगुरूंनी  मागणी तात्काळ मान्य केली; तसेच दुरुस्तीपत्रक काढण्याचे सूचित केले. विशेष म्हणजे कुलगुरूंचे आदेश असूनही दुरुस्तीपत्रकात जुनाच नियम प्रसिद्ध करण्यात आला. पदवी  प्रमाणपत्रावरील नाव, अर्जावरील नाव आणि रहिवासी पत्त्यावरील नाव जुळत नसल्यास संबंधित अर्ज अवैध ठरतील, असे त्यात नमूद करण्यात आले. दुरुस्तीपत्रक पाहिल्यानंतर  संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणूक निर्णय अधिकारी खोडसाळपणा करीत आहेत. कुलगुरूंनी आश्‍वासन देऊनही चार हजार महिला मतदारांना अवैध ठरवण्यात आल्याची  टीका संघटनांच्या पदाधिकार्यांनी केली. दरम्यान, मतदारयादीवर आक्षेप मागवण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्र किंवा विवाह प्रमाणपत्र सादर केल्यास नाव वैध होऊ शकते, मात्र  दिवाळीच्या सुटीत प्रक्रिया करणे अवघड झाले आहे. सर्व कागदपत्रे जमा करून पुन्हा एकदा विद्यापीठ प्रशासनाला देणे जिकीरीचे असल्यामुळे काही मतदारांनी नोंदणीस नकार दिला  आहे. महिला मतदारांच्या नावाबाबत अभ्यास करूनच विद्यापीठाने नियमावली तयार करणे अपेक्षित होते.