Breaking News

बँण्ड-बँजो व्यावसायिकांच्या मागण्या मान्य

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : बँण्ड आणि बँजो व्यवसायिकावर लावण्यात आलेले निर्बंध शिथील करुन त्यांना व्यावसायासाठी आवश्यक असणार्‍या परवानग्या  मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले होते. आरटीओ आणि पोलीस प्रशासनाने बँण्ड व बेंजो व्यावसायिकांच्या मागण्या मान्य  केल्या. यामुळे नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात या व्यावसायिकांना आपला व्यवसाय करता आला. 
सत्कारप्रसंगी अध्यक्ष बाबासाहेब माने, उपाध्यक्ष बबन जाधव, सचिव अशोक जाधव यांच्यासह किरण जाधव, संजय दाभाडे, संतोष माने, यांच्यासह सदस्य उपस्थित  होते. सातारा जिल्हा बॅण्ड व बँजो संघटनेची नुकतीच स्थापना झाली संघटनेचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब माने, उपाध्यक्ष बबन  जाधव, सचिव अशोक जाधव यांना नोंदणीपत्र प्रदान करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने जाचक अटी लादल्याने बँण्ड, बेंजो व्यवसायिक आणि यावर  अवलंबून असणारे हजारो कलाकारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली असून आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी संघटनेने आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली  होती.
बदलत्या काळानुसार बॅण्ड आणि बँजो व्यवसायातही आमुलाग्र बदल झाला आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेवूनच हे व्यावसायिक व्यवसायासाठी लागणारे साहित्य,  वाहन यामध्ये बदल करतात. या संघटनेच्या विविध मागण्या आहेत. जुन्या चारचाकी वाहनावर अत्याधुनिक वाद्य बसवण्यास परवानगी मिळावी. ध्वनीवर्धक यंत्रणा  बसवण्याचा शासन निर्णय. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या जाचक अटी, आदी नियम व अटींमुळे हे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ  आली आहे. यातून तोडगा काढावा, अशी मागणी संघटनेने केली होती. तसेच संघटनेच्या बिर्‍हाड धरणे आंदोलनातही सहभागी होवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  धरणे आंदोलन केले होते.
आरटीओ आणि जिल्हा पोलीस प्रशासनासोबत चर्चा झाल्यानंतर बँण्ड आणि बेंजो व्यावसायाला अडथळा ठरणारे नियम शिथील करण्याची विनंती उपस्थितांनी  केली. त्यावेळी प्रशासनाने जाचक अटी शिथील केल्या. त्यामुळे व्यवसायिकांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो कलाकारांना खर्‍या अर्थाने न्याय  मिळाला.