Breaking News

माशांबद्दल अफवा पसरवणा-यांवर कारवाई करा; रायगड जिल्हा कोळी समाज संघाची मागणी

अलिबाग, दि. 06, ऑक्टोबर - माशांबाबत चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी रायगड जिल्हा कोळी  समाज संघाने रायगडच्या पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. अलिबाग तालुक्यातील समुद्र किनार्‍यावर सापडणार्‍या माशांसंदर्भात समाजमाध्यमावर अफवा उठवल्या  जात आहेत. या अफवांमुळे काही दिवसांपासून ग्राहकांनी मासळी बाजाराकडे पाठ फिरवले आहे.
मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळ आणि सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टीट्यूट यांच्या माध्यमातून ज्या किनार्‍यांवर मासे मिळाले तेथील मासे  आणि परीसरातील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. या कुठलेही रासायनिक पदार्थ आढळून आले नाही, त्यामुळे हे मासे खाण्यासाठी योग्य असल्याचे स्पष्ट झाले  आहे. मात्र समाजमाध्यमामधून याबाबत अजूनही चुकीची माहिती प्रसारीत केली जात आहे. हिबाब लक्षात घेऊ अफवा पसरवणार्‍यावर कायदेशीर कारवाई केली जावी  अशी मागणी रायगड जिल्हा कोळी समाज संघाने केली आहे. धर्मा नागू घारबट. मदन कोळी, प्रविण हाशा तांडेल. मिलिंद राघा कोळी यांनी हे निवेदन पोलीस  अधीक्षकांना दिले.
दसर्‍याच्या दिवशी नवगाव समुद्र किनार्‍यावर पेरा पध्दतीने मासेमारी करणार्‍या मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात मच्छी सापडली होती. यात कोळंबी, जवळा, शिंगाडा,  पाकट या माश्यांचा मोठ्या प्रमाणात समावेष होता. खोल समुद्रात आढळणारे स्टिंग रे अर्थात पाकट मासे किनार्‍यावर शेकडोंच्या संख्येनी आढळल्याने एकच खळबळ  उडाली होती.
या घटनेनंतर समजमाध्यमात निरनिराळ्या वावड्या उठण्यास सुरवात झाली. यात रासायनिक द्रव्यातून विषबाधा होऊन मासे किनार्‍यावर आले आहेत. एम व्ही बंदरी  नामक जहाज खडकावर धडकल्याने त्यातून रसायन गळती झाली आहे. त्यामुळे हे मासे खाऊ नये अशी अफवा पसरवली जात आहे. यामुळे लोकांच्या मनात संभ्रम  निर्माण झाला आहे. लोकांनी मासेखरेदीकडे पाठ फिरवाली आहे.