Breaking News

‘जीएसटी’च्या विरोधात मालवाहतूकदारांचा 9,10 ऑक्टोबरला देशव्यापी ‘चक्काजाम’

मुंबई, दि. 06, ऑक्टोबर - ‘जीएसटी’ करप्रणालीतील काही धोरणांच्या विरोधात तसेच डिझेल दरवाढ व वाहतूक पोलिसांचा भ्रष्टाचार या मुद्यांवर 9 आणि 10  ऑक्टोबर रोजी देशव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा ‘ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’तर्फे देण्यात आला आहे. मुंबईच्या ‘बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट  असोसिएशन’नेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय स्तरावर चक्काजाम आंदोलन 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होऊन ते दुस-या  दिवशी 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. बी.जी.टी.ए.चे प्रवक्ते महेंद्र आर्य यांनी चक्काजाम आंदोलनाची माहिती दिली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी  ही माहिती दिली.
पंतप्रधान मोदी यांनी काही कठोर निर्णय घेतले. त्यातील नोटा रद्दच्या आणि रोखविहिन व्यवहाराचे आम्ही स्वागत केले. परंतु, ‘जीएसटी’मधील काही धोरणांचा  मालवाहतुकीवर वाईट परिणाम होत आहे. व्यापारी मालमत्तेच्या विक्रीवरही सरकार वस्तू व सेवा कर आकारत आहे. त्यामुळे वाहतुकदारांचे नुकसान होत आहे. म्हणून  आम्ही या आंदोलनात सक्रीय सहभाग घेणार आहोत, असेही आर्य यांनी सांगितले.