Breaking News

क्रिकेटच्या बॅटचे आमिष दाखवून मुलाचे अपहरण, दोन आरोपींना अटक

परभणी, दि. 28, ऑक्टोबर - क्रिकेटच्या बॅटचे आमिष दाखवून बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्यानंतर तक्रार दाखल होताच त्वरेने तपासाची चक्रे फिरवून परभणी पोलिसांनी  एका दिवसात अपहृत मुलाची सुखरूप सुटका केली व दोन्ही आरोपींना अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की येथील गोरक्षण भागात राहणारा अभिषेक अन्सीराम  दावलबाजे हा बारा वर्षाचा मुलगा 25 ऑक्टोबर रोजी सकाळी क्रिकेट खेळायला जातो असे सांगून सायकल घेवून घराबाहेर पडला. तो रात्र झाली तरी परत आलाच नाही. त्यामुळे  त्याच्या पालकांनी परभणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याबाबत माहिती काढली असता गेल्या चार पाच दिवसांपासून दोनजण क्रिकेट खेळावयाच या ईदगाह मैदानात  येत होते व मुलांना चौकार षटकारावर बक्षीसेही देत होते. त्यांनीच अभिषेक याला क्रिकेटची बॅट देण्यासाठी मैदानात बोलावले होते अशी माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींचे स्केच  तयार करून शोध सुरू केला. तपासासाठी दोन दिशेने दोन पथके पाठविण्यात आली. त्यापैकी एका पथकास आरोपी उदगीर येथे सापडले. पोलिसांनी अभिषेकची सुखरूप सुटका  करून त्याला पालकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात अपहरण करणारे जिलानी खाजा सिकलकर व कलीम शहानू सिकलकर दोघेही राहणार परांडा जिल्हा उस्मानाबाद यांना अटक  केली आहे. अपहरणामागचा हेतू अजून पोलिसांना समजलेला नाही. अधिक तपास चालू आहे.