Breaking News

नव्या पिढीला कौशल्य विकासाचे ज्ञान उपलब्ध करून देणे गरजेचे - खा. शरद पवार

सातारा, दि. 05, ऑक्टोबर - पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काळाची गरज म्हणून 20 व्या शतकात महाराष्ट्राच्या दऱया खोऱयात शिक्षणाच्या  विस्तारीकरणासाठी प्रयत्न केला. कर्मवीरांचा हा विचार मध्यवर्ती ठेऊन गेल्या 98 वर्षात संस्थेने विस्ताराबरोबर गुणवत्तेला प्राधान्य देऊन शैक्षणिक कार्य केले आहे.  तथापि आज जगात जे झपाटयाने बदल सुरू आहेत. त्या दिशेने आपण बदलले पाहिजे. नव्या पिढीला स्वतःच्या पायावर आत्मविश्‍वासाने उभा राहण्यासाठी कौशल्य  विकासाचे ज्ञान उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.खा.शरदरावजी पवार यांनी केले. 
रयत शिक्षण संस्थेच्या 98 व्या वर्धापन दिन समारंभात मा.खा.शरदरावजी पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलपती व संस्थेच्या  मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा.आ.डॉ.पतंगरावजी कदम उपस्थित होते. कार्यक्रमास खा.विजयसिंह मोहिते-पाटील, आ.दिलीप वळसे-पाटील, आ.बाळाराम पाटील,  मा.रामशेट ठाकूर, मा.ऍड. भगीरथ शिंदे, सौ.मिनाताई जगधने, मा.बबनराव पाचपुते,मा. दादाभाऊ कळमकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
कौशल्य विकासाचे महत्व आणि गरज स्पष्ट करून खा.शरदरावजी पवार पुढे म्हणाले - नव्या पिढीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण  गरजेचे असून ही गरज लक्षात घेऊन संस्थेने संशोधन, क्रीडा, शेती, प्रशासन, औद्योगिक क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असलेल्या व्यक्तिंना संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत  सामावून घेतले आहे. डॉ.रघुनाथ माशेलकर, मा.डॉ.अनिल काकोडकर, मा.प्रभाकर देशमुख यांच्या सहकार्यातून संस्थेमधून कौशल्य विकासाने परिपूर्ण विद्यार्थी  घडविण्याचे काम निश्‍चितपणे केले जाईल. सिम्बॉयसिस स्किल डेव्हल्पमेंट विद्यापीठाबरोबर यासाठीच सहकार्य करार केला आहे. नव्या पिढीची जिज्ञासा वाढविण्याची  जबाबदारी आपली आहे.
आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या कौटुंबिक जबाबदारीचा उल्लेख करून खा.शरदरावजी पवार पुढे म्हणाले - अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची पुर्ण जबाबदारी संस्थेने  घेतली असून त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य संस्थेचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि सेवक यांच्याकडून मिळत आहे. समाजातील उपेक्षित मुलांना सक्षमपणे उभा  करण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत ते संस्थेमार्फत निश्‍चितपणाने केले जातील.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.पतंगरावजी कदम म्हणाले - कर्मवीर अण्णांनी एका हरिजन मुलाला घेऊन संस्थेची सुरूवात केली. व्हॉलंटरी शाळा, माध्यमिक  विद्यालये, छत्रपती शिवाजी कॉलेज या माध्यमातून उच्च शिक्षण सुरू केले. आज संस्थेने गुणवत्तेचा ध्यास घेतला असून महाराष्ट्रात शरदरावजी पवार यांनी रयतच्या  माध्यमातून शैक्षणिक परिवर्तनाची चळवळ सुरू केली आहे ती देशपातळीवर घेऊन गेले पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या कामासाठी संपूर्ण महाराष्ट्र  त्यांच्या पाठीशी उभा राहिल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव प्रिं.डॉ.भाऊसाहेब कराळे यांनी केले. संस्थेचे चेअरमन मा.डॉ.अनिल पाटील यांनी कार्यक्रमाची भूमिका आणि  संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी रयत शिक्षण पत्रिका आणि रयत लाईव्ह ऍप चे उदघाटन व प्रकाशन खा.शरदरावजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी रयत शिक्षण संस्था व कुपर कार्पोरेशन प्रा.लि. यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यानिमित्ताने मा.फारूक कूपर यांचा सत्कार करण्यात आला.  संस्थेच्या उभारणीत कर्मवीर भाऊराव पाटील यांना मोलाचे सहकार्य करणाऱया विविध मान्यवरांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार संस्थेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी,  शिक्षक व शाखा यांना प्रदान करण्यात आले. विशेष पुरस्कार म्हणून श्री.ए.के.निकम, डॉ.विजय कुंभार, श्री.संजय चौधरी, सौ.संगिता शिंदे, प्रा.संभाजी पाटील व  इतरांना देऊन सन्मानीत करण्यात आले. सर्व उपस्थितांचे आभार सहसचिव मा.श्री.विलासराव महाडिक यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिवलिंग  मेनकुदळे व श्री.सागर माने यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, लाईफ मेंबर, शाखाप्रमुख, रयत सेवक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.