Breaking News

हवाईदल भरतीसाठी येणार्‍या उमेदवारांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या - किशोर राजेनिंबाळकर

जळगाव, दि. 31, ऑक्टोबर - मुलजी जेठा महाविद्यालय येथे 7 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या हवाईदल मेळाव्यासाठी मोठया प्रमाणात उमेदवार  उपस्थित राहणार आहे. या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये. यासाठी त्यांना आवश्यक त्या प्राथमिक सुविधा संबंधित यंत्रणांनी उपलब्ध करुन द्याव्यात. असे  निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.
जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या भरती मेळाव्याच्या पूर्वतयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या भरती मेळाव्यास अगोदरच्या दिवसापासूनच उमेदवार शहरात येण्यास सुरुवात होईल. या उमेदवारांना राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, सार्वजनिक  शौचालयाची सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच भरतीसाठी मैदानावर लागणार्‍या आवश्यक त्या सुविधांबरोबर अग्निशमन यंत्रणा, म्बुलन्स सुविधा तसेच कायदा व  सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध ठेवण्यात यावा. भरती मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार  नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे घ्यावी, असेही जिल्हाधिकार्‍यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी या भरती मेळाव्यासाठी संबंधित विभागांनी  केलेल्या तयारीचाही आढावा घेतला.