Breaking News

भडगाव नगराध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेनेची सरशी

जळगाव, दि. 28, ऑक्टोबर - जिल्ह्यातील भडगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसनेची सरशी झाली असुन राष्ट्रवादीकडून सत्ता काबिज केली  आहे. संख्याबळ नसतांनाही शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पाटील यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीच्या सुवर्णा पाटील पराभुत यांचा त्यांनी पराभव केला.
नगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने निवडणुक घेण्यात आली. नगर परिषदेत राष्ट्रवादीचे 10, त्या खालोखाल शिवसेनेचे 9, भाजप 1 व अपक्ष 1 असे  पक्षीय बलाबल आहे. अडीच वर्ष नगर परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यात सुरूवातीला प्रशांत पवार व त्यानंतर शामकांत भोसले यांनी नगराध्यक्षपद भुषविले. स्पष्ट  बहुमत कोणाकडेच नसल्याने अपक्ष व भाजप नगरसेवकाच्या टेकुवर सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी व सेनेचा प्रयत्न सुरू होता. सुरूवातीला राष्ट्रवादीने अपक्ष नगरसेविका  सुवर्णा शाम पाटील यांचा पाठींबा मिळवित सत्तेचा जुगाड बसविला होता. यावेळी माघारी नंतर निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र पाटील व राष्ट्रवादीच्या सुवर्णा पाटील हे दोघं  रिंगणात होते. दोघंही पक्षातील दिग्ग्ज्जांच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
नगर परिषदेच्या सभागृहात निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर सेनेचे राजेंद्र पाटील व राष्ट्रवादीच्या सुवर्णा पाटील यांच्यात सरळ लढत झाली. हात उंचावून मतदान  घेण्यात आले. राजेंद्र पाटील यांना 11 व सुवर्णा पाटील यांना 8 मते मिळाली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे सुभाष पाटील व वैशाली महाजन हे नगरसेवक वैद्यकीय कारणाने  गैरहजर राहीले. निवडणुकीत अगोदर दोन वेळा पराभुत झालेले शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पाटील यांनी यंदा मात्र आपली मांड पक्की केली होती. त्यांना भाजप व अपक्ष  नगरसेवकाच्या मदतीने विजयश्री खेचुन आणला. उपनगरध्यक्ष पदासाठी सेनेकडून करूणा सुनिल देशमुख यांनी व राष्ट्रवादीकडून योजना पाटील यांनी उमेदवारी अर्ज  दाखल केले होते. उपनगरध्यक्ष निवडणूकीत नगराध्यक्ष निवडणूकीसारखेच स्थिती राहील्याने उपनगरध्यक्षपदी शिवसेनेच्या करूणा देशमुख यांना विजयी घोषीत  करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रशांत पवार, शामकांत भोसले, अमोल पाटील, सुवर्णा शाम पाटील, राजेंद्र देशमुख यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.  पिठासीन अधिकारी तथा पाचोरा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.