Breaking News

विद्यार्थिनींच्या जेवणामध्ये पुन्हा अळी सापडल्याने मेसचा ठेका रद्द

सोलापूर, दि. 06, ऑक्टोबर - विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या जेवणात एकाच आठवड्यात तिसर्‍यांदा अळी सापडल्याने विद्यापीठ प्रशासनाने कारणे दाखवा  नोटीस बजावलेल्या समर्थ केटरर्सचा ठेका रद्द करून महालक्ष्मी केटरर्सला ठेका दिला आहे. विद्यापीठात सुमारे 170 विद्यार्थिनींसाठी मेसची सुविधा उपलब्ध करून  दिली जाते. जेवण नेहमीच निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याची तक्रार होती. प्रशासन विद्यार्थिनींच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करीत होते. जेवणात अळी निघाल्याची विद्यार्थिनींनी  तक्रार केल्यानंतरही दखल घेतली नाही. नाईलाजाने जेवणावर बहिष्कार टाकण्यात आला. विद्यार्थिनींच्या बहिष्काराचे वृत्त प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना  समजल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. तिसर्‍यांदा तोच प्रकार घडल्यानंतर विद्यापीठाने मेस चालकाचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला. राजा, हो मी याच  मेसचे जेवण जेवतो, अळी निघत असते का? असे म्हणून प्रभारी कुलसचिव पी. प्रभाकर यांनीच निकृष्ट जेवणाबाबत सफाई देण्याचा प्रयत्न केला होता. आता नवीन  ठेका वारंवार येणार्‍या तक्रारींमुळे जुना ठेका रद्द करून नव्या मेसचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे, प्रभारी कुलसचिव पी.प्रभाकर यांनी सांगितले.