सिग्नल सुरू होण्याआधीच पुढे जाण्याची घाई जिवावर बेतली
औरंगाबाद, दि. 09, ऑक्टोबर - हिरवा सिग्नल नसताना पिवळ्या सिग्नलमध्येच पुढे जाण्याच्या घाई करणार्या दिलीप विठ्ठलराव गलधर दुचाकीस्वाराला सुसाट टँकरने धडक दिली. टँकरचे चाक गलधर यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी दीडवाजता ही घटना बीड बायपासवर देवळाई चौकामध्ये घडली. दिलीप गलधर रविवारी दुपारी देवळाईकडून शहराकडे मोटारसायकलने जात होते. दुपारी सुमारे 1.20 वाजेच्या सुमारास देवळाई चौकातील वाहतूक दिवा ग्रीनवरून पिवळा झाला. यावेळी गलधर हे वेगात निघाले. त्याचवेळी झाल्टा फाट्याकडून महानुभाव आश्रम चौकीकडे निघालेल्या टँकरसह अन्य वाहने पुढे जाण्यासाठी वेगात निघाले. अर्ध्या रस्त्यावर आलेले असताना एका ट्रकचालकाने त्यांना वाचविले मात्र पुढच्या टँकरने त्यांना चिरडले. यातच टँकरचालकाने त्यांना सुमारे आठ ते दहा फुट फरपटत नेले. यामुळे गलधर हे जागीच ठार झाले.