Breaking News

ब्रेनडेड रूग्णाच्या अवयव दानातून 9 जणांना जीवनदान शक्य

अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर - आजच्या वैद्यकीय उपचारातील सुविधा व प्रगत तंत्रज्ञानामुळे अवघड शस्त्रक्रियाही सुलभ झाल्या आहेत. मात्र योग्यवेळी अवयव उपलब्ध न झाल्याने  अनेक रुग्ण दगावतात. त्यासाठी सर्वप्रथम अवयव दानाविषयी जागृती व प्रबोधन करून ब्रेनडेड (मेंदुमृत) रुग्णांच्या अवयव दानाने 9 रुग्णांना नवे जिवन मिळू शकते व आपली प्रिय व्यक्ती  अवयव रुपात जिवंत असल्याचे व चांगले कार्य केल्याचे समाधान रुग्णांच्या परिवाराला मिळू शकते,असे प्रतिपादन अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ.मनिष पाठक यांनी केले.
नगरमधील पी.एम.मुनोत ट्रस्टच्या वतीने आयोजित डॉक्टर तुमच्या भेटीला अंतर्गत यकृत काळजी या विषयावर यकृत प्रत्यारोपण तज्ञ डॉ.बिपीन विभूते व अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ.मनिष  पाठक यांचे अवयव दानाचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ट्रस्टचे शरद मुनोत,रमणलाल मेहेर,अ‍ॅड.विजय लुणे,दिलीप मुथा उपस्थित होते.यावेळी डॉ.पाठक म्हणाले क ी,आपल्या देशात अवयवदान हा ज्वलंत प्रश्‍न असून याविषयी सामाजिक संस्था व सह्याद्री हॉस्पिटलतर्फे सतत जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. समाजाला व रुग्णांच्या नातेवाईकांना  याव्हे महत्व समजले तरच खर्‍या अर्थाने अवयवदान चळवळीला व्यापक स्वरूप लाभेल. अवयवदाना साठी ब्रेनडेड(मेंदुमृत)रुग्णांच्या अवयवांचा फायदा गरजू रुग्णांना होतो.ब्रेनडेड  झालेल्या रुग्णांचे हृदय, रक्तदाब, श्‍वास व इतर अवयव उत्तम कार्य करण्यासाठी औषधे व काळजी घेतली जाते. घरी असलेल्या ब्रेनडेड रुग्णांची काळजी अशा प्रकारे न घेतल्याने त्या रुग्णाचे  अवयव वापर कमी प्रमाणात कामी येतात. ब्रेनडेड म्हणजे काय हे रुग्णांच्या नातेवाईकांना नीट समजवून त्यांना अवयव दानासाठी प्रवृत्त करणे हे अत्यंत कठीण काम असते.अवयव  दानानंतर रुग्णांवर पारंपारिक व रीतीनुसार नातेवाईकांना सर्व विधी करता येतात.सर्वात महत्वाचे म्हणजे आपली प्रिय व्यक्ती अवयव रूपाने जिवंत असल्याचे समाधान लाभते. अवयवदाना विषयीचे गैरसमज,अवयव व देहदान, नेत्रदान यांतील फरक याविषयी तसेच उपस्थितांच्या शंकाविषयी डॉ.मनिष पाठक यांनी सखोल मार्गदर्शन केले.अवयव दानाबाबत जैन समाज अधिक  जागृत झाला असून नेत्रदाना बाबत नगर शहरातील काम उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी विशेष नमूद केले.
यकृत रोपणाविषयी डॉ.बिपीन विभूते यांनी सांगितले कि पूर्वी या शस्त्रक्रियेसाठी येणार्‍या खर्चापेक्षा आता निम्म्या खर्चात या शस्त्रक्रिया होत आहेत.हृदयाप्रमाणेच सतत कार्य करणारा यकृत हा  अवयव असून आहार पचनाचे रक्तात रुपांतर करणे व शरीरातील विषारी घटकांचा निचरा करण्याचे कार्य यकृतावर असते.सामान्य माणसाच्या शरीरातील 30 यकृताचा वापर होत असतो. अ तिमद्यपान,अनुवांशिकता,यकृत आकार वाढणे यामुळे त्याचा अतिवापर होऊन ते खराब होते. पोटात पाणी होणे,मेंदूवर दबाव, किडनीवर ताण ही प्राथमिक लक्षणे असतात.रुग्णांची तपासणी  करूनच अत्यावश्यक रुग्णांवरच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात.विविध तपासण्या, शासकीय कमिटीची मान्यता, रुग्ण व यकृत दात्याची मानसिक तपासणी व चाचण्या करून सर्व  गोष्टींची पूर्तता करूनच यकृत प्रत्यारोपण केले जाते.योग्यवेळी अवयव उपलब्ध झाले तरच रुग्णांना वाचविता येते.तसेच याविषयीचे गैरसमज दूर होणे महत्वाचे आहे आजच्या काळात शस्त्र क्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण सतत वाढतच आहे.शरद मुनोत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.रमणलाल मेहेर यांनी आभार मानले.