Breaking News

8 नोव्हेंबरला राष्ट्रवादी घालणार ’नोटाबंदी श्राद्ध’

सोलापूर, दि. 01, नोव्हेंबर - नोटाबंदीची घोषणा गेल्या वर्षी नोव्हेंबरला झाली. त्यानंतर वर्षभरात काहीही निष्पन्न झाले नाही. बँकेच्या रांगेत उभे राहून 105 जणांना जीव गमवावा  लागला. लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या. उद्योगधंद्यांची पीछेहाट झाली. अशा नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केला. पंढरपूरच्या चंद्रभागा  घाटावर आणि शहरात सिद्धेश्‍वर तलावाच्या घाटावर पिंडदान करून मुंडन करण्यात येईल. त्यात हजारो कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे  यांनी दिली. जिल्हा बँकेतील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
नोटाबंदी, जीएसटी, शेतकर्‍यांची कर्जमाफी या सर्व गोष्टी निव्वळ फसव्या ठरल्या. त्याने सामान्यांची क्रूर चेष्टाच सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांनी राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन उभे करण्यास सांगितले. त्यातीलच हा एक कार्यक्रम आहे. ते अधिक तीव्र करून शासनाचे लक्ष वेधण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ही कसली कर्जमाफी? कर्जमाफीतला घोळ अद्याप संपत नाही. बँकांमध्ये पैसेच जमा नाहीत. दिवाळीत प्रमाणपत्रे देऊन शेतकर्‍यांची बोळवण करण्यात आली. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत  शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरू आहेत. हे कसले संवेदनशून्य सरकार आहे. - दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस