Breaking News

महिला मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने 7 मृत्युमुखी

नाशिक, दि. 26, ऑक्टोबर - मालेगाव तालुक्यातील अजंग वडेल येथे महिला मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर 30-35 फुट पाण्यात कोसळल्याने 6 ते 7 महिलांचा बुडून मृत्यू झाल्याची  प्राथमिक माहिती आहे. ट्रॅक्टर ट्रोलीसह बंधार्‍यात कोसळले असून 20-25 मजूर अद्यापही पाण्यात अडकले असल्याची माहिती मिळत आहे.
ढवळीविहिरी नावाच्या बंधार्‍याच्या बांधावरून अनेक वाहने दररोज ये-जा करतात. शेतीची कामे सुरु असल्यामुळे मजुरांची ने-आन या परिसरातून नियमित होत होती.सकाळी शेतात  30-35 मजूर याच मार्गाने आले होते. सायंकाळी शेतातून घराकडे जात असताना ही दुर्घटना घडली. ट्रॅक्टरमध्ये 30-35 मजूर होते. बांधावरची माती ढासळल्याने हा अपघात  घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच याठिकाणी आजूबाजूच्या खेड्यातील नागरिक, मालेगाव तसेच अजंग वडेल येथील रुग्णवाहिका तसेच जेसीबीच्या सहाय्याने मदतकार्य सुरु आहे. 6  ते 7 महिला पाण्यावर तरंगताना दिसून आल्यानंतर त्यांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच अनेक महिला मजूर गंभीर जखमी झाल्या  आहेत. परिसरात युद्धपातळीवर मदतकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.