Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी सरासरी 70 टक्के मतदान

रत्नागिरी, दि. 17, ऑक्टोबर - जिल्ह्यातील 215 ग्रामपंचायतींसाठी आज झालेल्या निवडणुकीत सरासरी 70 टक्के मतदान झाले. भातकापणीचा हंगाम सुरू असल्याने सकाळच्या  वेळेत काहीसे संथ असलेल्या मतदानाने सायंकाळी वेग घेतला. सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार आहे. सकाळी 11 च्या सुमारास अनेक  निकाल स्पष्ट होतील, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींमध्ये 2033 उमेदवार सदस्यपदासाठी, तर 408 उमेदवार सरपंचपदासाठी उभे होते. काही निवडणुका बिन विरोध झाल्याने 29 जागी सरपंचपदासाठी, तर 23 ठिकाणी केवळ सदस्यपदासाठी निवडणूक झाली. जिल्ह्यातील एक लाख 94 हजार 215 मतदार मतदानाला पात्र होते. त्यात  92 हजार 343 पुरुष आणि एक लाख एक हजार 870 महिला मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी सुमारे एक लाख 40 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
रत्नागिरी तालुक्यात 29 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 8 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर 21 ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी 183, तर  सरपंचपदासाठी 51 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राजापूर तालुक्यात 25 ग्रामपंचायतींच्या सदस्यत्वाच्या 86 जागांसाठी 177 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पंचायत स मितीच्या किसान भवन सभागृहा उद्या मतमोजणी होईल. पंचवीस ग्रामपंचायतींच्या 199 जागांपैकी 103 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. राहिलेल्या 86 जागांसाठी आज  मतदान झाले. संगमेश्‍वर तालुक्यात 22 ग्रामपंचायतींच्या 90 जागांसाठी 183 उमेदवारांनी लढत दिली. खेड तालुक्यातील नऊ, गुहागर तालुक्यातील 15, चिपळूण तालुक्यातील  19, तर मंडणगड तालुक्यात 13 ग्रामपंचायतींसाठीही आज शांततेत मतदान झाले.