Breaking News

दररोज 3 हजार किलो कच-यावरील प्रक्रियेतून गांडूळखत निर्मिती

मुंबई, दि. 12, ऑक्टोबर - बृहन्मुंबई महापालिकेच्या 10 कार्यालयांच्या परिसरांसह मंत्रालयाजवळील महिला विकास संस्थेच्या आवारात महापालिकेच्याच पुढाकाराने स्वच्छ मुंबई प्रबोधन  अभियानांतर्गत ओल्या कच-यापासून खत निर्मिती आता सुरु झाली आहे. या सर्व 11 ठिकाणी मिळून दररोज सुमारे 2 हजार 400 किलो एवढ्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती होत  आहे. तसेच आणखी 6 ठिकाणी एकूण 600 किलो क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या धर्तीवर आपल्या सोसायटीच्या परिसरात खत निर्मिती प्रकल्प उभारावयाचा  झाल्यास मार्गदर्शनासाठी शहर विभागातील नागरिकांनी विनायक भट यांच्या 9004-445-244 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. पूर्व उपनगरातील नागरिकांनी सुनिल सरदार यांच्या  9833-539-023; तर पश्‍चिम उपनगरातील नागरिकांना पोमसिंग चव्हाण यांच्या 7045-950-797 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा; अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन  खात्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली आहे.
विलेपार्ले पश्‍चिम परिसरात असणा-या महापालिकेच्या ’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि आर. एन. कूपर रुग्णालय’ या परिसरात उत्पन्न होणा-या कच-याचे  ओला व सुका कचरा असे विलगीकरण केल्यानंतर ओल्या कच-यापासून गांडूळ खत तयार होण्यासाठी महाविद्यालयाच्याच परिसरात प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पात दररोज  सरासरी 100 किलो ओला कचरा टाकण्यात येतो. यापासून साधारणपणे 6 आठवड्यात गांडूळ खत तयार होते.
बोरिवली पश्‍चिम परिसरात असणा-या महापालिकेच्या ’आर मध्य’ विभाग कार्यालयाच्या परिसरात देखील कच-यापासून खत निर्मिती सुरु करण्यात आली आहे. येथील प्रकल्पाची क्षमता  दररोज साधारणपणे 150 किलो ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्याची आहे. बोरिवली पश्‍चिम परिसरातील महापालिकेच्या वनविहार उद्यानामध्ये 100 किलो ओल्या कच-यापासून गांडूळ  खत निर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. तर ’आर दक्षिण’ विभाग कार्यालयांतर्गत कांदिवली पश्‍चिम परिसरातील दिव्यदर्शन सोसायटीच्या आवारात असणा-या महापा लिकेच्या मंडई क्षेत्रातील ओल्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाची दैनंदिन क्षमता ही 50 किलो ओल्या कच-यावर प्रक्रिया  करण्याची आहे.
महापालिकेच्या ’पी उत्तर’ व ’पी दक्षिण’ विभाग कार्यालयांच्या परिसरात देखील गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांची क्षमता ही अनुक्रमे 100 व  150 किलो एवढी आहे. तर ’के पूर्व’ विभाग कार्यालयाच्या परिसरात ओल्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती करणारे 2 प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून यांची क्षमता ही प्रत्येकी  100 किलो एवढी आहे. विलेपार्ले परिसरातील उप मुख्य पर्यवेक्षक यांच्या कार्यालयाच्या आवारात दैनंदिन 25 किलो एवढ्या क्षमतेच्या ओल्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती करणारा  प्रकल्प सुरु झाला आहे.
भायखळा पूर्व परिसरातील ’वीरमाता जिजाबाई भोसले व प्राणिसंग्रहालय’ च्या परिसरात महापालिकेचा सर्वाधिक क्षमतेचा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पात दररोज सुमारे  पंधराशे किलो एवढ्या ओल्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती होत आहे. तसेच मंत्रालयाजवळील सारंग इमारतीसमोर महिला विकास संस्थेच्या आवारात देखील महापालिकेच्या पुढाक ाराने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरु झाला असून त्याची दैनंदिन क्षमता ही 25 किलो एवढी आहे.
वरीलनुसार महापालिकेच्या 10 जागांमध्ये, तर महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील एका जागेवर ओल्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती करणारे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. या सर्व  प्रकल्पांच्या माध्यमातून दररोज सुमारे 2 हजार 400 किलो ओल्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती होत आहे. त्याचबरोबर आणखी 6 ठिकाणी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचे क ाम अंतिम टप्प्यात आहे. ज्यामुळे आणखी 600 किलो ओल्या कच-यापासून खत निर्मिती करण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. ज्यामुळे या प्रकल्पांची एकत्रित प्रक्रिया क्षमता दररोज 3  हजार किलो एवढी होणार आहे, अशीही माहिती श्री. बालमवार यांनी दिली आहे.
या प्रकल्पांमुळे सुयोग्य व पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापन साध्य होण्यासोबतच कचरा वहन खर्चात देखील बचत करणे शक्य झाले आहे. त्यासोबतच या प्रकल्पातून प्राप्त होणा-या गांडूळ  खताचा व जीवामृताचा वापर प्राधान्याने महापालिकेच्याच परिसरातील झाडांसाठी वा उद्यानांमध्ये करण्यात येणार असल्याने उद्यानांच्या खत विषयक खर्चात देखील काही प्रमाणात बचत  साध्य होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.