Breaking News

अंडर-17 फिफा वर्ल्डकप अंतिम फेरीत इंग्लंड आणि स्पेन भिडणार

कोलकाता, दि. 27, ऑक्टोबर - इंग्लंड आणि स्पेन  याच दोन युरोपियन संघांमध्ये रंगणार आहे फिफा अंडर सेव्हन्टिन विश्‍वचषकाचा अंतिम सामना. या पार्श्‍वभूमीवर कोलकत्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर इंग्लंड आणि स्पेन हे दोन्ही संघ पहिल्या विजेतेपदासाठी सज्ज झाले आहेत.
अंडर सेव्हन्टिन विश्‍वचषकात इंग्लंड आणि स्पेन या दोन्ही दोन्ही संघांची विजेतेपदाची पाटी अद्यापही कोरीच आहे. विश्‍वचषकाच्या 32 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडनं यावेळी पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पेनची मात्र विश्‍वचषकात दाखल होण्याची ही तब्बल चौथी वेळ आहे. 1991, 2003 आणि 2007 साली स्पेननं अंतिम फेरी गाठली होती. दुर्दैवानं तिन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होत. त्यामुळे यावेळी दोन्ही संघात पहिल्या विजेतेपदासाठीचा संघर्ष फुटबॉल रसिकांना पहायला मिळेल.
इंग्लंडनं यंदाच्या विश्‍वचषकात आतापर्यंत अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला आहे. साखळी फेरीत ‘फ’ गटात चिली, मेक्सिको, इराक या संघावर मात करत इंग्लंड संघ अव्वल स्थानी राहिला. उपउपांत्यपूर्व फेरीत जपानविरूद्ध गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या सामन्यात  पेनल्टीवर 5-0 असा विजय मिळवला. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेचा 4-1 आणि उपांत्य सामन्यात ब्राझीलचा 3-1 असा धुव्वा उडवत इंग्लंडनं दिमाखात अंतिम फेरी गाठली.