Breaking News

ऐन दिवाळीत 16 तारखेपासून एसटी कर्मचा-यांचा संपाचा इशारा

औरंगाबाद, दि. 03, ऑक्टोबर - मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने अखेर एसटी महामंडळाला संपाची नोटीस बजावली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन  करार करावा, या मागणीसाठी निर्णय होत नसल्याने 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ऐन दिवाळीत संप पुकारण्यात येणार आहे. वेतन करारावेळी एसटी  महामंडळाच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीची दखल महामंडळाने घेतलेली नाही. महामंडळाने प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नेमलेल्या  विशेष वेतन सुधार समितीसमोरही कामगारांनी वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली. वेतन सुधार समितीने महामंडळ प्रशासनासमोर शिफारशी सादर केल्या  आहेत. एसटी कामगार संघटनेसह इतर संघटनांनीही सातव्या वेतन आयोगाची मागणी केली आहे. संघटनेने घेतलेल्या मतदानात कामगारांनी संपाला कौल दिला  आहे. त्यानुसार संघटनेचे महासचिव हनुमंत ताठे यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला 29 सप्टेंबर रोजी 16 ऑक्टोबरपासून एसटी कामगार संपावर जाणार असल्याचे  पत्र दिले आहे. या संपाला महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स फेडरेशनने पाठिंवा दिला आहे.